कानामागून आले अन्‌ तिखट झाले 

सुनील सूर्यवंशी
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

भाजपची राज्यात वाढती ताकद पाहता जिल्ह्यांमधून भाजपचे "इनकमिंग' सुरूच असून, काही दिग्गजांनी प्रवेश केला आहे; तर काही दिग्गज भाजपत येण्याच्या मार्गावर आहेत. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपमधील अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहणारे व पडत्या काळात भाजपचा झेंडा निवडक कार्यकर्त्यांना घेऊन टिकवून ठेवणारे अनेक नेते व्यक्ती हतबल होताना दिसत आहेत. पक्षात होणारे "इनकमिंग' मात्र जुन्यासाठी कानामागून आले अन्‌ तिखट झाले असेच आहे. त्यामुळे अनेक जुने पदाधिकारी नाराज आहेत 
 

भाजपची राज्यात वाढती ताकद पाहता जिल्ह्यांमधून भाजपचे "इनकमिंग' सुरूच असून, काही दिग्गजांनी प्रवेश केला आहे; तर काही दिग्गज भाजपत येण्याच्या मार्गावर आहेत. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपमधील अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहणारे व पडत्या काळात भाजपचा झेंडा निवडक कार्यकर्त्यांना घेऊन टिकवून ठेवणारे अनेक नेते व्यक्ती हतबल होताना दिसत आहेत. पक्षात होणारे "इनकमिंग' मात्र जुन्यासाठी कानामागून आले अन्‌ तिखट झाले असेच आहे. त्यामुळे अनेक जुने पदाधिकारी नाराज आहेत 
 

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपमध्ये प्रवेश केलेले व प्रवेश करू इच्छिणारे व विधानसभा तिकिटासाठी नुकतेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधून आलेले अनेक दिग्गज परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सरकारचे "संकटमोचक' गिरीश महाजन यांच्या भेटी घेत आहेत. यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून भाजपच्या संकटकाळात भाजपचे झेंडे हाती धरणारे, मोर्चे काढणारे, आंदोलन करणारे व बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्त्यांसह पक्षाशी एकनिष्ठ असणारे जुन्या व ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नेते व्यथित देखील झाले असून, काहींनी तर उघडपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरवात केली आहे. त्यामुळे परत एकदा जुने भाजपवासी व नवीन भाजपत आलेले असे गट- तट निश्‍चितच बघायला मिळतील. या बाबत पक्ष संघटन नेते काहीही सांगत असले, तरी हे कटू सत्य आहे 

एकीकडे भाजपविरोधी भूमिका घेणारे जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री महाजन यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यांनी पक्षांतर केलेच, तर परत एकदा विधानसभेत नवीन समीकरण होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर व त्यापूर्वी आपली राजकीय सोय कशी होईल, यादृष्टीने पक्षनिष्ठेला फाटा देत व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी सोयीचे राजकारण आता जिल्हावासीयांना बघायला मिळणार आहे. 

विधानसभेचे वातावरण राज्यात तयार होत असतानाच जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील अनेकांनी घुंगरू बांधले असून, विविध फलक लावताना, वाढदिवस साजरा करताना त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी स्वतःला भावी आमदार म्हणून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. एकंदरीत अभ्यास केला असता चार मतदारसंघात इच्छुकांची संख्या यंदा वाढली असून, एका जागेसाठी सहा ते सात लोक उमेदवारीसाठी इच्छुक असून, तिकीट आपल्यालाच मिळणार या आविर्भावात ही मंडळी सध्या तरी आहे. 
 
भाजपचे तिकीट म्हणजे लॉटरी 
भावी आमदाराबाबत देखील ग्रामीण भागात जोरात चर्चा सुरू आहे. एकूणच भाजपचे तिकीट म्हणजे लॉटरीच आहे, अशा मानसिकतेत असंख्य इच्छुक उमेदवार आहेत. त्यात एकनिष्ठ उमेदवारांना कितपत संधी मिळेल, या बाबत भाजपचे ज्येष्ठ नेते व भाजपचे कट्टर व जनसंघापासून भाजपच्या सोबत असणारे इच्छुक चिंतेत दिसत आहे. त्यामुळं सध्या भाजपच्या जुन्या व इच्छुक नेत्यांचा मनात "कानामागून आले अन्‌ तिखट झाले', अशी भावना व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp loksabha election