महिला सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचा एल्गार 

धनराज माळी
Tuesday, 13 October 2020

महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासनही महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही. कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या

नंदुरबार ः महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत, असा आरोप करीत महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे करावेत, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. राज्य शासनाविरोधात विविध घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणला होता. 

सोमवारी सकाळी अकराला मोर्चाला सुरवात झाली. या वेळी महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोनाच्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे प्रकार घडत आहेत. मोर्चात प्रदेश सदस्या ॲड. उमा चौधरी, विता जयस्वाल, नगरसेविका संगीता सोनवणे, संगीता सोनगिरे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही 
महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासनही महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही. कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एकदिवसीय आंदोलन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते. तरीही असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सोमवारी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे, असे खासदार डॉ. हीना गावित यांनी या वेळी सांगितले.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP's Elgar Morcha on women's security in Nandurbar