
वाहन विक्रीचा वेग कमी होऊ शकतो. मुळात या क्षेत्रातून चांगल्याप्रकारे महसूल मिळत असल्याने येणाऱ्या अर्थसंकल्पात वाहनांवर असलेल्या "जीएसटी'सह वाढीव कर कमी केल्यास वाहन क्षेत्राला वेग मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहन विक्रेत्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
जळगाव : वाहन क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्यात प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जात असल्याने वाहनांच्या इंजिनमध्ये काही बदल केले जात आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत "बीएस 6' या मॉडेलची वाहने रस्त्यावर धावताना दिसतील. वाहनाचे हे नवीन मॉडेल आले, तरी त्याच्या किमतीतही वाढ झालेली असेल. परिणामी वाहन विक्रीचा वेग कमी होऊ शकतो. मुळात या क्षेत्रातून चांगल्याप्रकारे महसूल मिळत असल्याने येणाऱ्या अर्थसंकल्पात वाहनांवर असलेल्या "जीएसटी'सह वाढीव कर कमी केल्यास वाहन क्षेत्राला वेग मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहन विक्रेत्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
जाणून घ्या - Union Budget 2020 : आवास योजनेची व्याप्ती वाढल्यास अर्थव्यवस्थेला चालना!
"जीएसटी'त कपात व्हावी
किरण बच्छाव ः वाहन क्षेत्रात सध्या मंदीचे सावट आहे. या क्षेत्रावर अनेक रोजगार अवलंबून असल्याने या क्षेत्राला चालना देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात सुधारणा व्हावी. प्रामुख्याने "जीएसटी'मध्ये कपात व्हावी. तसेच "आरटीओ'कडून आकारल्या जाणाऱ्या करात सवलत द्यावी. त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर वाढू न देता स्थिर राहिल्यास महसूलवाढीस मदत होईल. आता "बीएस 6' बस येत असल्याने "बीएस 4 वाहनाचे उत्पादन बंद केले असले, तरी त्यांची विक्री सुरूच ठेवावी. मुळात प्रत्येक शहरात मूलभूत सुविधा मिळाल्यास वाहन क्षेत्र हे आपोआप चालते. रस्तेच चांगले नसतील तर वाहन खरेदीवरही परिणाम होतो.
"जीएसटी कमी झाल्यास फायदा
योगेश चौधरी ः ऑटोमोबाईल क्षेत्रात "जीएसटी' मोठ्या प्रमाणात लावला आहे. याचा परिणाम वाहन खरेदीवर होतो. कर वाढल्याने ऑटो क्षेत्रातील लहान डिलरशिप बंद झाली आहे. त्यामुळे बेरोजगारीही वाढतेय. याचा विचार सरकारने करून अर्थसंकल्पात "जीएसटी' कमी करण्याचे नियोजन करायला हवे. शिवाय आता "बीएस 6' वाहने बाजारात येत असल्याने किमतीतही वाढ होणार आहे. परिणामी मार्केट आणखी खाली येऊ शकतो. यामुळे "जीएसटी कमी झाल्यास फायदा होऊ शकतो.
भविष्यात "ई-बाइक'चा उत्तम पर्याय
परितोष चौधरी ः "ई-बाइक' ही येणाऱ्या काळासाठी एक चांगला पर्याय आहे. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे "ई-बाइक'ला अनेकांची पसंती आहे. परंतु या "बाइक'साठी दिली जाणारी सबसिडी वाढवून दिली आणि "जीएसटी' कमी केला, तर "बाइक'च्या किमती कमी होतील. जळगावात "ई-बाइक'चे तीन-चार शोरूम असून, यातून चांगल्यापैकी "बाइक'ची विक्री होते. अर्थसंकल्पात बदल केल्यास विक्री दुप्पट होऊ शकते. शिवाय "ई-बाइक'ला चालना देण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना "बाइक' वापरणे सहज सोपे होईल.
"बीएस 4'ची पासिंग बंद होणार
यझदी पाजनिगरा ः वाहन क्षेत्रात "बीएस 6' ही संकल्पना येत आहे. एप्रिलपासून "बीएस 4'ची पासिंग करणे बंद होणार असून, "बीएस 6' मॉडेलमध्ये असलेल्या गाड्यांच्या किमती वाढलेल्या असतील. यामुळे "जीएसटी'सह इतर वाढीव कर कमी केल्यास गाड्यांच्या किमती आवाक्याबाहेर जाणार नाहीत. शिवाय, या क्षेत्रालाही चालना मिळू शकेल.