केबलचे नवे दर आवाक्‍यात... पहा कसे आहेत पॅकेज

अमोल भट
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

"ट्राय'च्या या निर्णयाचे अर्थकारणावर काय पडसाद उमटतात हे पाहणे रंजक ठरणार आहे येत्या 1 मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, एका वर्षात दोनदा धोरण बदलविल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

जळगाव : देशातील मंदीसदृश परिस्थिती, वाढती महागाई यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यात वाहिन्यांचे दरही वाढतात की कसे आणि अशा परिस्थितीत वाहिन्यांचे दर आणखी कमी करण्याच्या दृष्टीने "ट्राय'ने नवे धोरण ठरविले आहे. त्यानुसार ग्राहकांना 160 रुपयांत दोनशे चॅनेल्स बघता येणार आहेत. मात्र, "ट्राय'च्या या नव्या धोरणानुसार त्यात कोणते चॅनेल्स असतील, कुठले नसतील याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. 
लोकप्रिय व ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या वाहिन्यांसाठी अधिक दर मोजावे लागतील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे पैसे वाचविणारे हे धोरण वाटत असले तरी प्रत्यक्षात या नव्या नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतरच ते कळू शकेल. "ट्राय'च्या या निर्णयाचे अर्थकारणावर काय पडसाद उमटतात हे पाहणे रंजक ठरणार आहे येत्या 1 मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, एका वर्षात दोनदा धोरण बदलविल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

असा आहे नवीन नियम 
"ट्राय'च्या नवीन नियमानुसार 160 रुपयांत 200 वाहिन्या ग्राहकांना पाहता येणार आहेत. यात सरकारी 26 वाहिन्यांचाही समावेश आहे.परंतु हे करताना "ट्राय'ने वाहिन्यांचे मूल्य 19 रुपयांवरून 12 रुपये इतके कमी केले आहे. केवळ 12 रुपये मूल्य असलेल्या वाहिन्या पॅकेजमध्ये समाविष्ट करता येणार असल्याचे "ट्राय'ने स्पष्ट केले आहे. वाहिन्यांचे दर कमी केल्याने याचा अर्थकारणावर परिणाम होणार असल्याचे ब्रॉडकास्टर्सचे म्हणणे आहे. 

नव्या दरप्रणालीबाबत संभ्रम 
नव्या धोरणामुळे ग्राहकांना वाढीव दराने वाहिन्या पाहाव्या लागतील, अशी भीती केबलचालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. यात ब्रॉडकास्टर्सना वाहिन्यांचे दर बदलण्याचा अधिकार असल्याने जास्त टीआरपी असलेल्या आणि सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचे दर वाढवून त्या वाहिन्या पॅकेजबाहेर ठेवण्यात येतील, अशी शक्‍यता आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन दरप्रणाली लागू करण्यात आली. 1 मार्चपासून लागू करण्यात आलेल्या नियमावलीमुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

जिल्ह्यातील केबल यंत्रणा : दृष्टिक्षेप 
एकूण केबलधारक ग्राहक : 1,75,000 
एकूण केबलचालक (ऑपरेटर) : 600 
एकूण एमएसओ (मल्टीसर्व्हिस ऑपरेटर) : 03 
खासगी एमएसओ (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर) : 07 

"ट्राय'तर्फे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली, ही केवळ दिशाभूल करणारी आणि ग्राहकासाठी फसवी बाब म्हणता येईल. एकीकडे वाहिन्यांचा दर कमी केल्याचा दावा "ट्राय' करत असले तरी वाहिन्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्यांसाठी अधिकचेच पैसे मोजावे लागणार आहेत. 
- विजय चंदेले, अध्यक्ष, केबल ऑपरेटर्स संघटना, जळगाव जिल्हा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cabel tv channel new rate package trai