वर्दळीची ठिकाणे अजूनही "सीसीटीव्ही'च्या प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले. 

जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले. 
शहरातील कायदा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर राहावी, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर मुख्य चौकांमध्ये सुमारे 56 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोल युनिट पोलिस अधीक्षक कार्यालयात असल्याने त्या ठिकाणाहून शहरातील घडामोडींवर पोलिस "नजर' ठेवून आहेत. 
गणेशोत्सवानंतर संपूर्ण शहरातील मुख्य ठिकाणी व संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप मुख्य रस्ते वगळले तर शाळा, महाविद्यालये व आकाशवाणी, काव्यरत्नावली, प्रभात चौक, चित्रा चौक यासह महत्त्वाचे चौक "सीसीटीव्ही'च्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र "सकाळ'च्या पाहणीतून दिसून आले. 

अनेक चौकांमध्ये अधिक कॅमेरे 
पोलिस विभागाने शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेरे सुरू आहेत. यामध्ये काही चौकांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कॅमेरे लावण्यात आले आहे तर काही चौकांत गरज असताना त्याठिकाणी केवळ एकच कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एखादी घटना घडल्यास पोलिसांना त्या भागातील नागरिकांनी लावलेल्या कॅमेऱ्याचा आसरा घ्यावा लागतो. 

शाळा- महाविद्यालय परिसरात गरज 
शहरातील शाळा, महाविद्यालयीन परिसरात टवाळखोरांकडून मुलींची छेडखानी व हाणामारीच्या घटना घडत असतात. त्यांच्यावर वचक राहण्यासाठी पोलिसांनी मू. जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय यांसह मुख्य चौकांमध्ये कॅमेरे बसविण्याची आवश्‍यकता आहे. 

कॅमेऱ्यांमुळे गुन्हे उघडकीस 
पोलिस प्रशासनाने लावलेल्या कॅमेऱ्यामुळे सोनसाखळी, मोटारसायकल यांसह घरफोडी व हाणामारीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहे. परंतु या आतापर्यंत शहरात केवळ 56 च कॅमेरे असून पोलिस विभागाने शहरात अजून कॅमेरे बसविल्यास चोरट्यांवर वचक निर्माण होईल. तसेच कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी कमी झालेली आहे. 
 
याठिकाणी आहेत कॅमेरे 
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र्य चौक, नवीन बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, बेंडाळे महाविद्यालय, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, महापालिका इमारत, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, भिलपुरा चौक, आसोदा रोड, सुभाष चौक, बेंडाळे चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cctv city chok