जळगाव-चाळीसगाव महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जळगाव- चाळीसगाव- चांदवड महामार्गावरील चाळीसगावपर्यंतच्या जिल्ह्यातील टप्प्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन खासदार व आम्ही संयुक्तपणे काम पूर्ण करण्यासंबंधी एजन्सी व सरकारशी संपर्क साधून होतो. हे काम पूर्णत्वाकडे असून शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग अपघातमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल. 
- उन्मेष पाटील (खासदार, जळगाव) 

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक "753-जे' या जळगाव- भडगाव- चाळीसगाव- मनमाड- चांदवड महामार्गातील जळगाव- चाळीसगाव या दोन टप्प्यातील काम दोन वर्षांत जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. या 110 किलोमीटरच्या टप्प्याचे कॉंक्रिटीकरण होत असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेल्या या मार्गाचे रुपडेच पालटले आहे. लवकरच या टप्प्याचे लोकार्पण होईल, असे सांगितले जात आहे. 

हेही पहा - गावाकडे निघाले...अन्‌ पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू

साधारण तीन वर्षांपूर्वी जळगाव-भडगाव- चाळीसगाव- मनमाड- चांदवड हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे म्हणून वर्गीकृत झाला आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर होऊन रुंदीकरणाचे कामही निश्‍चित झाले. अन्य राष्ट्रीय महामार्गांसारखे चौपदरीकरण नसले तरी त्याच धर्तीवर त्याचे विस्तारीकरण करण्याचे ठरले. जळगाव- नाशिक तसेच नाशिक- औरंगाबादला चाळीसगाव- कन्नडमार्गे जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता म्हणून या मार्गाची ओळख व महत्त्व असल्याने त्याचे विस्तारीकरण करणे आवश्‍यक बनले होते. त्या पार्श्‍वभूमीवर तीन वर्षांपूर्वी काम मंजूर होऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत अशोक बिल्डकॉम या इन्फ्रास्ट्रक्‍चरमधील नामांकित कंपनीची निविदा मंजूर होऊन कामासंबंध कार्यादेश देण्यात आले. 

दोन वर्षांत उभे राहिले काम 
अशोक बिल्डकॉमला दिलेले काम जळगाव- पाचोरा- भडगाव हा जवळपास 52.200 किलोमीटरचा 237 कोटी 30 लाख रुपये खर्चाचा एक व भडगाव- चाळीसगाव हा 46.800 किलोमीटरचा साधारण 210 कोटी 21 लाखाचा दुसरा टप्पा असे होते. दोन्ही टप्पे मिळून 109 किलोमीटरच्या या कामासाठी साडेचारशे कोटींचा खर्च येणार आहे. अडीच वर्षांपूर्वी 6 जून 2018ला हे काम सुरू झाले. रस्तेबांधणीत नावलौकिक असल्याने अशोक बिल्डकॉमने हे काम दोन वर्षांत बऱ्यापैकी उभे केले. 

...असे पूर्ण झाले काम 
गेल्या काही वर्षांत या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत होती. चाळीसगावपर्यंत 110 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जवळपास 4 तासांचा अवधी लागत होता. त्यामुळे हे काम हाती घेऊन तातडीने पूर्ण करण्यासंबंधी कसोशीने प्रयत्न झाले. रात्रंदिवस काम सुरू करून या कामाला आता अंतिम टप्प्याच पोचविण्यात आले आहे. जळगाव-भडगाव या 52 किलोमीटर टप्प्यापैकी 37 टक्के तर भडगाव- चाळीसगाव टप्प्यातील 46 पैकी 43 किलोमीटरचे काम म्हणजे दोन्ही टप्पे मिळून जवळपास 80 टक्‍क्‍यांवर काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण रस्ता कॉंक्रिटचा झाल्याने या मार्गाचे रुपडेच पालटले असून काही महिन्यांत त्याचे लोकार्पण होण्याची शक्‍यता आहे. 

दृष्टिक्षेपात काम 
जळगाव- भडगाव : 52.200 कि.मी. 
खर्च अपेक्षित : 237 कोटी 30 लाख 
भडगाव- चाळीसगाव 46.800 कि.मी. 
खर्च अपेक्षित : 210 कोटी 21 लाख 
एकूण टप्पा : 109 कि.मी. 
मोठे पूल : 01 
लहान पूल : 15 
पाइप मोऱ्या : 40 
स्लॅब मोऱ्या : 15 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon chilisgaon highway work 80 parcntage complited