रेशनच्या धान्यासाठी नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

केशरी कार्ड धारकांपैकी प्राधान्य कुटुंबाचा शिक्का नसलेल्यांना धान्य दिले जात नाही. यामुळे रेशनकार्ड धारकांध्ये नाराजी आहे. अनेक परिसरातील केशरी शिधापत्रिका धारकांची हीच तक्रार आहे. 

जळगाव ः शासनाने तीन महिन्याचे धान्य एकावेळी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे रेशनवरून धान्य घेणाऱ्यांची तीन महिन्याची सोय होणार आहे. मात्र ज्यांच्याकडे रेशन कार्ड असूनही त्यांना रेशनवर यादीत नाव नसल्याचे सांगून परतावून लावले जात आहे, अशांनी रेशनवरील धान्य आम्हालाही मिळावी यामागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ घातला. 

ेतीन महिन्याचे धान्य एकावेळी मिळणे, त्यातही केंद्राकडून प्रती मानसी पाच किलो तांदूळ मोफत मिळणे ही रेशन कार्ड धारकांसाठी मोठी संधी आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिक आपल्याकडे असलेले रेशन कार्ड घेऊन आपल्या परिसरातील रेशन धान्य दुकानांवर जाऊन धान्याची मागणी करीत आहे. मात्र केशरी कार्ड धारकांपैकी प्राधान्य कुटुंबाचा शिक्का नसलेल्यांना धान्य दिले जात नाही. यामुळे रेशनकार्ड धारकांध्ये नाराजी आहे. अनेक परिसरातील केशरी शिधापत्रिका धारकांची हीच तक्रार आहे. 

यामुळे आज शहरातील पिंप्राळा, बागवान गल्ली, शिवाजी नगर, मेहरूण आदी भागातील नागरिक आपले रेशन कार्ड घेऊन तहसील कार्यालयात गेले. तेथे तुमची कागदपत्रे जमा झाली नसल्याने त्यावर धान्य देण्यात यावे असा शिक्‍का मारलेला नाही. यामुळे तुम्हाला धान्य मिळणार नाही असे सांगितले. यामुळे रेशनकार्ड धारकांनी तेथे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर रेशन मिळावी यामागणीसाठी गोंधळ घातला. पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्वांनी सोशल डिस्टींग्शन पाळून लांब उभे राहा असे सांगून प्रत्येकाच्या अडचणी समजावून घेतल्या. रेशन कार्ड धारकांनी आम्हाला वीस वर्षापासून धान्य मिळते आताच मिळत नाही, काही म्हणाले मागील महिन्यापर्यंत धान्य मिळाले आताच मिळत नाही, असे एक ना अनेक तक्रारी सांगितल्या. 
त्यावर श्री.सूर्यवंशी यांनी तुमच्या कार्डाशी झेरॉक्‍स, कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्डाची झेरॉक्‍स देवून जा. त्यावर कार्यवाही करून नंतर धान्य मिळेल. असे सांगितले. यामुळे काहींनी रेशनकार्डाच्या झेरॉक्‍स दिल्या. तर काहींनी उद्या आणून देतो असे सांगितले. 

दोन जणांना धान्य मिळाले 
आलेल्या रेशनकार्ड धारकांपैकी ज्यांना मागील महिन्यात धान्य मिळाले होते त्यांचे कार्ड घेऊन संबंधित दुकानदारांना धान्य देण्यास सांगण्यात आले. यामुळे काही कार्ड धारकांनी समाधान व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Citizens confused at District Office for ration grains