कोरोना' दोन पावलांवर, सावध व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

शहराला "कोरोना व्हायरस'चा विळखा पडला असून, जळगावकरांसाठी ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे दोन पावलांवर आलेल्या "कोरोना'ला अटकाव करण्यासाठी वेळीच सावध व्हावे लागणार आहे. दरम्यान, निम्म्याहून अधिक वॉर्डात रुग्ण आढळून आल्याने हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. 

जळगाव : शहरात "कोरोना'बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आज हरिविठ्ठलनगर, आदर्शनगर या नवीन भागांसह सम्राट कॉलनी, शाहूनगर, पवनगर, सिंधी कॉलनी येथे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण शहराला "कोरोना व्हायरस'चा विळखा पडला असून, जळगावकरांसाठी ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे दोन पावलांवर आलेल्या "कोरोना'ला अटकाव करण्यासाठी वेळीच सावध व्हावे लागणार आहे. दरम्यान, निम्म्याहून अधिक वॉर्डात रुग्ण आढळून आल्याने हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. 

पवननगरातील संख्या चार 
शहरातील कांचननगर परिसरतील पवननगरात गेल्या काही दिवसांपूर्वी महिला "कोरोना' पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्या महिलेच्या कुटुंबीयांसह तिच्या संपर्कात आलेल्यांना "क्‍वारंटाइन' करण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्या महिलेच्या शेजारी राहणारी 30 वर्षीय महिला देखील "पॉझिटिव्ह' आली आहे. त्यामुळे पवननगरातील "पॉझिटिव्ह' रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. 

सम्राट कॉलनीतील तरुण बाधित 
सम्राट कॉलनीतील 30 वर्षीय तरुणाला "कोरोना'ची लागण झाली आहे. हा तरुण "एमआयडीसी'तील एका मोठ्या प्रतिष्ठित पाइप कंपनीत नोकरीस आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल होता. त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. तसेच यापूर्वी सम्राट कॉलनीतील एक पॉझिटिव्ह रुग्णाचा देखील मृत्यू झाला असून, हा रुग्ण त्याचा घराच्या मागच्या बाजूस राहत असल्याचे समोर आले आहे. 

शाहूनगरातील दोघे 
शहरातील शाहूनगरातील दोन रुग्णांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. यामध्ये 24 वर्षीय तरुणासह 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हे दोघे एकाच कुटुंबातील असून, ते गेल्या तीन, चार दिवसांपूर्वी "पॉझिटिव्ह' आलेल्या महिलेच्या कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. 

सिंधी कॉलनीत आणखी दोन 
गेल्या चार दिवसांपूर्वी सिंधी कॉलनीतील एका व्यापाऱ्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला होता. त्याच्या कुटुंबीयांना "क्‍वारंटाइन' करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबातील दोन जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहे. त्यामुळे सिंधी कॉलनतील रुग्णांची संख्या तीन झाली आहे. 
 
आदर्शनगरात "कोरोना'चा शिरकाव 
आदर्शनगर या उच्चभ्रू वस्तीत 22 वर्षीय तरुण "पॉझिटिव्ह' आढळला आहे. हा तरुण खासगी क्‍लासेस घेत असतो. परंतु "लॉकडाउन'च्या काळात क्‍लास बंद आहेत. तसेच या तरुणाच्या वडिलांचे गेल्या 15 दिवसांपूर्वी निधन झाले. यावेळी या तरुणाची बहिण डोंबिवलीहून आली होती. यामाध्यमातून संसर्ग झाल्या असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हरिविठ्ठलनगरातील 38 वर्षीय महिला देखील "पॉझिटिव्ह' आली असून या ठिकाणांवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city corona virus one day sevan positive case