आठशे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हजारो नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती.

जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सुमारे 20 हजारांवर गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यानुसार ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने एका संस्थेला कुत्रे निर्बीजीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापासून दिले आहे. या संस्थेमार्फत दोन महिन्यांत सुमारे आठशे मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मोकाट कुत्र्यांसंदर्भातील तक्रारी लक्षात घेता आज स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी डॉक्‍टरासह संस्थेच्या कामाची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हजारो नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. महापालिका प्रशासनाने कुत्रे निर्बीजीकरणाच्या अनेकदा निविदा काढल्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, एका खासगी संस्थेने यासाठी जबाबदारी घेऊन 12 नोव्हेंबरपासून महापालिकेच्या जुना खत कारखान्याच्या जागेत निर्बीजीकरणाचे काम सुरू केले. संस्थेमार्फत सुरू असलेल्या या कामाची स्थायी समिती सभापती ऍड. हाडा यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली

हेपण पहा -  मधुमेहासाठी जडबुटी देतो म्हणून जंगलात नेले अन्‌ केले हे कृत्य

"आयएमए'चे पदाधिकारी सोबत 
निर्बीजीकरण ठिकाणी संस्थेची काय व्यवस्था आहे. प्रत्यक्षात किती कुत्र्यांवर निर्बीजीकरण केले, याची नोंद देखील तपासली. एजन्सीमार्फत केलेल्या नोंदीनुसार नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान सुमारे 800 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती ऍड. हाडा यांनी दिली. यावेळी "आयएमए'चे माजी सचिव डॉ. विलास भोळे व डॉ. स्नेहल फेगडे उपस्थित होते. 

तक्रारीनुसार पकडतात कुत्रे 
महापालिका अथवा संस्थेला ज्या भागातून तक्रार आली असेल त्या ठिकाणी पहाटे पाच वाजेदरम्यान संस्थेचे प्रशिक्षित कर्मचारी मोकाट कुत्रे पकडतात. त्यानंतर त्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून चोवीस तासानंतर पुन्हा ज्या ठिकाणावर पकडले आहे तेथे सोडले जाते. तसेच ज्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली असेल त्या कुत्र्यांची ओळख व्हावी, यासाठी कान व्ही आकारात कापले जातात. 

कुत्र्यांना मारणे गुन्हा 
प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कुत्र्यांना मारता येत नाही, तसेच निर्बीजीकरण केल्या ठिकाणी पुन्हा त्यांना सोडणे, तसेच दुग्धपान करणाऱ्या कुत्रीचे निर्बीजीकरण त्या कालधीत न करणे आदी नियम लागू आहे. परंतु अनेक नागरिक कुत्रे निर्बीजीकरण केल्यानंतर त्या गल्लीत पुन्हा सोडण्यास विरोध करत आहे. मात्र, तसे करता येत नसल्याची माहिती सभापती ऍड. हाडा यांना देण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city stray dog nirbijikaran muncipal corporation