मधुमेहासाठी जडबुटी देतो म्हणून जंगलात नेले अन्‌ केले हे कृत्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

औषध देतो असे सांगून त्याने या पाचही जणांना चारठाणा मधपूरी परिसरात नेले. तेथे एका झोपडी वजा खोलीत बसविले थंड पेय देखील पाजले औषध दाखवीत असताना त्यांच्याच टोळीतील 10 ते 15 जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही व्यक्‍तींच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घ्यायला आले असा बनाव करीत टोळीतील पवार यास मारण्याचा सोंग केला

मुक्ताईनगर : मधुमेहासाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेलेल्या पाच जणांना चारठाणा मधपूरी भागातील जंगलात नेऊन बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल 32 तोळे सोने व 52 हजार रोख रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी (ता. 21) सायंकाळी पाचच्या सुमारास वडोदा वन हद्दीत घडली. 

या भागात बाहेरील लोकांना विविध दुर्मिळ वस्तू देण्याच्या नावाने विश्वास संपादन करून बाहेरील लोकांना बोलवतात आणि त्यांना मारहाण करून लूटमार करणाऱ्याचे टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. "डायबेटिस'साठी काळी हळद आणि जळी बुटी देतो, असा विश्वास पटवून पवार नामक व्यक्‍तीने मुंबई येथील जटाशंकर गौड (वय 53) गोरेगाव मुंबई, नागेंद्र प्रसाद ठिवर (वय 52) नाला सोपारा ईस्ट जिल्हा पालघर, भरत परमार (वय 50) कांदिवली वेस्ट मुंबई, दीपक परमार (वय 50) मालाड ईस्ट मुंबई व अतुल मिश्रा (वय 35) गोरेगाव- मुंबई यांना मुक्ताईनगर बोलविले. येथील रक्षा पेट्रोल पंपाजवळ फोन करणारा व्यक्‍ती भेटला.

क्‍लिक करा - जन्मदात्या आईचा केला छळ...अन्‌ झाली प्रवेश बंदी

औषध देतो असे सांगून त्याने या पाचही जणांना चारठाणा मधपूरी परिसरात नेले. तेथे एका झोपडी वजा खोलीत बसविले थंड पेय देखील पाजले औषध दाखवीत असताना त्यांच्याच टोळीतील 10 ते 15 जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही व्यक्‍तींच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घ्यायला आले असा बनाव करीत टोळीतील पवार यास मारण्याचा सोंग केला आणि पाचही मुंबई कराना लाथाबुक्‍यांसह बांबूने बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोने रोकड आणि मोबाईल हिसकावून पोबारा केला. यात जटाशंकर गौड याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या असा तब्बल 32 तोळे सोने 52 हजार रोख आणि मोबाईल या लुटमरीत टोळीने पळवून नेले. 

घरी जाण्यास दिले 5 हजार 
ज्या इसमाने त्यांना बोलविले होते त्याने लूटमार करणारे टोळीचे सदस्य असताना अनोळखी असल्याचा बनाव केला आणि लूटमार झालेल्या पीडितांना तुम्ही येथून निघून जा नाहीतर पोलिस तुम्हालाच पकडतील असा आव आणला मदत म्हणून या पीडितांना 5 हजार देऊन या भागातून चालते व्हा असे सांगितले व त्याने स्वतः पोबारा केला. 

गंडविले गेल्याने पोलिसांकडे धाव 
आपण गंडविले गेलो हे लक्षात येताच मुंबईतील हे पाचही जण सायंकाळी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून त्यांनी संपर्क साधल्याने त्यांची दाद पुकार घेतली गेली. एक पोलिस कॉन्स्टेबल घेऊन त्यांना मधापूरी गावात दुपारी एकला नेण्यात आले मात्र गावात त्यांना कोणीही मिळून आले नाही. या नंतर त्यांना फिर्याद देणे कामी कुऱ्हा दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. 

टोळ्यांना पोलिसांचे अभय 
धनिकांना विश्वास संपादन करून जडी बुटी, नागमनी, दुतोंडी साप, केमिकल राईस, कास्याचे भांडे, या सह अन्य दुर्मिळ वस्तू देण्याच्या बहाण्याने या टोळ्या खरेदी दारांना येथे बोलवतात आणि त्यांची लूटमार करतात हा प्रकार इतका वाढला आहे की लूटमार होताना सर्वसामान्य नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी ते काणाडोळा करतात. या टोळ्यांना पोलिसांचे अभय असल्याचे ते उघडपणे लूटमार करतात असा सूर आवळला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar diabetise aayurvedik jadibuti gold jwellary