जिल्हा रुग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठक आज झाली. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड-19 (कोरोना रुग्णालय) रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज घोषित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठक आज झाली. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयातील सद्यःस्थितील दाखल रुग्णांपैकी ज्यांना घरी सोडणे शक्य असेल अशा रुग्णांना परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने त्यांना वाहन व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. मात्र , जिल्हा सामान्य रुग्णालयापासून रुग्णांना त्यांच्या घरापर्यंतचे भाड्याची रक्कम रुग्णांना अदा करावी लागेल. ज्यांना घरी सोडणे शक्य नसेल अशा रुग्णांना डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येईल.
पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अिधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे उपस्थित होते.

रोज अकरा ला नमुने पाठवा 
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, कोरोना संशयीतांचे चाचणीसाठी पाठवायचे नमुने दररोज सकाळी 8 ते 10 दरम्यान संकलीत करून 11 वाजेला पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत. तसा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा. 

तर कर्मचारी निलंबित करा.
कोरोनासारख्या विषाणूचा जिल्हा प्रशासन प्रभावीपणे सामना करीत असताना आरोग्य खात्यातील काही कर्मचारी बेकायदेशीररित्या गैरहजर आहेत. त्या सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना आरोग्य प्रशासनाने कामावर तात्काळ हजर होण्याविषयी कळविले असूनही जे कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. त्यांच्या जागेवर ग्रामीण रूणालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. कोरोना संबंधित रुग्णांकडून केस पेपरसह कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येवू नये. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital is corona hospital diclare collector dhakne