"सीसीटीव्ही'द्वारे "डॉक्‍टर' उपस्थितीवर निगराणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

रुग्ण दगावण्याची संख्याही राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यात जास्त आहे. "कोविड केअर सेंटर' म्हणून घोषित केलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याबाबत दक्षता घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

जळगाव : "कोरोना'चा रुग्ण असलेल्या जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी ताबडतोब सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय रुग्णांना फळे, अंडी देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की जिल्ह्यात दोनशेवर "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळले आहेत; तर रुग्ण दगावण्याची संख्याही राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यात जास्त आहे. "कोविड केअर सेंटर' म्हणून घोषित केलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याबाबत दक्षता घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय डॉक्‍टरच या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या डॉक्‍टरांवर निगराणी ठेवून रुग्णांवर चांगले उपचार होण्याकडे लक्ष देण्यात येईल. लवकरच या रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुग्णांवर डॉक्‍टर उपचार करीत आहेत किंवा नाही याची पाहणी करण्यात येईल. तसेच जे डॉक्‍टर काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

रुग्णांना अंडी, फळे देणार 
"कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण लवकरात बरे होऊन घरी परतावेत, अशीच इच्छा आहे. त्यामुळे या रुग्णांना उपचारासोबतच फळे, अंडी तसेच आयुष काढा देता येईल का, याचाही विचार सुरू आहे. या ठिकाणी दाखल झालेला रुग्ण बरा होऊन हसतमुखाने घरी जावा, हीच इच्छा असल्याचे मतही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केले. 

कोव्हीड रुग्णालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची महामारीचे संकट आल्याने संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाचे कोव्हीड रुग्णालय घोषीत करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे हे वैद्यकीय रजेवर गेले असल्याने रुग्णालयाची मदार ही प्रभारींच्या खांद्यावर आली आहे. 
जिलह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असून दिवसेंदिवस परिस्थिीती अत्यंत गंभीर बनत चालली आहे. या परिस्थिीवर मात करण्यासासाठी संपूर्ण शासकीय वैद्यकीय यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून दिवसरात्र काम करीत आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या महाविद्यालये अधिष्ठाता हे देखील दिवरात्र या रुग्णांवर उपचार करण्यासाठी काम करीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची प्रकृती बिघडली असल्याने ते तीन दिवसांपासून मेडीकल रजेवर गेले आहे. त्यांच्या जागी प्रभारी अधिष्ठाता म्हणून उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे हे त्यांचे काम पाहत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे दुसरीकडे अधिष्ठाता देखील मेडीकलच्यारजेवर गेले असल्याने त्यांच्या कामाची जबाबदारी ही प्रभारींच्या खाद्यांवर आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital doctor present cctv watch