
लकड्याने किंकाळ्या मारतच त्याच्या अंगावरील सर्व कपडे फाडले. त्यानंतर त्याने हातवर करत हातातील बेडी गरागर फिरवू लागला. यामुळे डॉक्टर घाबरून केबिनच्या बाहेर पळाले. तर शेख करीम तसेच राजेश पाटील यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, "सिंगल हड्डी' लकड्या पावरा कोणालाही जुमानत नव्हता.
जळगाव : कारागृहातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या बंदिवानाने अंगावरील कपडे काढून विवस्त्रावस्थेत धिंगाणा घातल्याची घटना घडली. दोन वृद्ध पोलिस आणि रुग्णालयाचे खासगी गार्ड यांच्याकडूनही नियंत्रणात येत नसलेल्या या बंदीने एका पोलिसाला कडाडून चावा घेतल्यानंतर हातवारे-लाथा फिरवून मारहाणीने रुग्णालय वेठीस धरले होते. अखेर जिल्हापेठ पोलिसांना पाचारण केल्यानंतर या कैद्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. झटके आल्यावर तो, आक्रमक होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेपण पहा - पोटचा गोळा क्षणात गेला अन् सुरू झाला मन हेलावणारा आक्रोश
लकडीया आसाराम पावरा (वय-23) ऊर्फ लकड्या हा कैदी खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला उपचारासाठी रविवारी सकाळी (11.15 वाजता) पोलिस जमादार राजेश रघुनाथ पाटील (वय-56) तसेच कर्मचारी शेख सलीम करीम शेख (वय-51) यांनी कारागृहातून जिल्हा रुग्णालयात आणले. केस पेपर काढल्यानंतर तपासणीसाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये लकड्याला नेण्यात आले. त्याठिकाणी अचानक लकड्याने किंकाळ्या मारतच त्याच्या अंगावरील सर्व कपडे फाडले. त्यानंतर त्याने हातवर करत हातातील बेडी गरागर फिरवू लागला. यामुळे डॉक्टर घाबरून केबिनच्या बाहेर पळाले. तर शेख करीम तसेच राजेश पाटील यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, "सिंगल हड्डी' लकड्या पावरा कोणालाही जुमानत नव्हता.
प्रयत्नांची शर्थ
लकड्याच्या हातातील बेडी राजेश पाटील यांनी पकडून दुसरा हात बेडीत अडकविण्याचा प्रयत्न केला असता लकड्याने पाटील यांच्या पाठीमागे जोराने चावा घेत दुखापत केली. चिडलेल्या संशयित कैद्याला सांभाळतांना दोघे पोलिस कर्मचारी यांची दमछाक होत ते घामाघूम झालेले होते. कैदी पोलिसांशी झटापट करीत असल्याचे कळाल्यानंतर सिव्हीलमधील सुरक्षा गार्ड, अन्य कर्मचाऱ्यांनी डॉक्टर कॅबीनमध्ये (नं.1) धाव घेतली. सर्वांचेच प्रयत्न तोकडे पडत असल्याने उपस्थित सर्वच हैराण झाले. संशयित शांत होण्याचे नाव घेईना, ग्णालयाच्या आवारात काही आदिवासी लोक थांबलेले होते. या आदिवासींना केबिनमध्ये नेऊन लकड्याशी बोलणे केल्यास तो शांत होईल, म्हणून जिल्हापेठ पोलिसांनी 5 ते 6 आदिवासी बांधवांना दालनात बोलविले. या लोकांनी त्याच्यांशी आदिवासी भाषेत संवाद साधत समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कोणालाही जुमानले नाही.
हातात "जल' घेऊन घेतली शपथ
घटना कळाल्यानंतर जिल्हापेठचे नाना तायडे, शेखर जोशी, हेमंत तायडे अशांनी धाव घेतली. बंदिवान उपचारही करू देत नाही, तसेच कपडेही अंगात घालू देत नसल्याचे चित्र दिसल्यानंतर पोलिस कर्मचारी नाना तायडे... मी वकील आहे.. काय झालंय तुला मी, सोडवेल असे म्हटल्यावर धिंगाणा घातलेल्या कैद्यात "भोंदूबाबा' अवतरला.. नंतर लकड्या पावरा म्हणाला, "चला हातात ज्वारी, जल घेऊन शपथ घ्या, की मला सोडणार...' त्यावेळी नाना तायडे यांनी हातात पाणी घेऊन शपथ घेत असल्याच्या थाटात म्हणाले, "मी सायंकाळपर्यंत तुझी सुटका करेल...' त्यानंतर कैद्याला उपचारासाठी दाखल केले. दीड तास चाललेले हे नाट्य शांत झाल्यानंतर पोलिसांसह रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.