
उमेश हा शाळेतून घरी आल्यावर खेळण्यास जातो असे सांगून तो त्याच्या मित्रासोबत शहरातील धरणगाव रस्त्यालगत झपाट भवानी मंदिराजवळील टकारखानजवळ गेला. त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाणी हे सात ते आठ फूट व गाळमिश्रित खोल होते.
पारोळा : राजीव गांधीनगरमधील रहिवासी असलेला बालाजी शाळेतील तिसरीतला विद्यार्थी उमेश दीपक महाले (वय नऊ) याचा झपाटभवानी माता मंदिराजवळील टकारखान येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेने महाले परिवारावर शोककळा पसरली असून, परिसर सुन्न झाला आहे. पोटचा गोळा क्षणात निघून गेल्याने मातेने एकच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून पारोळावासिय सुन्न झाले आहेत.
हेपण पहा - काळरूपी ट्रॅक्टरने घेतला विद्यार्थ्याचा बळी
उमेश हा शाळेतून घरी आल्यावर खेळण्यास जातो असे सांगून तो त्याच्या मित्रासोबत शहरातील धरणगाव रस्त्यालगत झपाट भवानी मंदिराजवळील टकारखानजवळ गेला. त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाणी हे सात ते आठ फूट व गाळमिश्रित खोल होते. उमेश यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. हे पाहून उभ्या असलेल्या मित्राने आरडाओरड केली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी त्याचे वडील दीपक महाले यांना दिली. यावेळी भगवान वानखेडे, किरण वानखेडे, मोहम्मद भाई, गौतम जावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. टकारखान्यातील पाण्यात उतरले. मात्र, पाणी खराब असल्याने उमेशचा मृतदेह बाहेर काढण्यास अर्धा तास लागला. त्यास उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
क्षणातच झाले होत्याचे नव्हते
नेहमीप्रमाणे उमेश हा शाळेतून आल्यावर आई- वडिलांना विचारूनच खेळण्यास जात होता. मात्र, आज त्याच्यावर काळाने झडप घातली. होत्याचे नव्हते झाल्याने महाले परिवारावर शोककळा पसरली. उमेशची वार्ता कळताच त्याच्या आईने कुटीर रुग्णालयात धाव घेऊन एकच हंबरडा फोडला. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. बालाजी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत पाटील व शिक्षकांनी धाव घेत महाले कुटुंबाचे सांत्वन केले. उमेशच्या मागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. वडील हातमजुरी करतात. त्याचा मोठा भाऊ रोहित पाचवीला आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.