जिल्हा रुग्णालयात कैद्यांच्या सरबराईवर शिक्कामोर्तब 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

कैदी वॉर्डाची यात्रा घडवून आणली जात असल्याबाबत "सकाळ'ने पाच महिन्यांपूर्वीच (30 सप्टेंबर) "स्टींग' करून वृत्त प्रसिद्ध केले होते. अशाच एका प्रकरणात कारागृह अधीक्षकाला जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. 29) फटकारले. 

जळगाव : आजारपणाचे सोंग करून जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डाला गंभीर गुन्ह्यातील कैद्यांनी आपला "अड्डा' बनवून घेतला आहे. विनासायास गुन्हेगारी नेटवर्क चालवण्यासाठी, दारू-सिगारेट, मोबाईल यासह सर्व प्रकारची सोय देखील होईल, अशी कैद्यांची सरबराई येथे राखली जाते. गंभीर गुन्ह्यातील हे कैदी याच जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवरून सर्वच बेकायदा कृत्ये घडवून आणतात. एवढेच नव्हे तर साक्षीदारांना धमकावण्यासाठी देखील या कैदी वॉर्डाची यात्रा घडवून आणली जात असल्याबाबत "सकाळ'ने पाच महिन्यांपूर्वीच (30 सप्टेंबर) "स्टींग' करून वृत्त प्रसिद्ध केले होते. अशाच एका प्रकरणात कारागृह अधीक्षकाला जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. 29) फटकारले. 

हेही पहा - माहेरून पंधरा लाख आण..नाही तर विचार कर

एरंडोल येथे कबड्डी स्पर्धेत मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणावरून गुंडांनी प्रा. मनोज पाटील यांच्या घरावर हल्ला चढवला होता. यात उमेश खंडू पाटील खून खटल्यातील प्रमुख संशयित माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पंकज नेरकर यांच्यासह इतर कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून आहेत. शनिवारपासून (ता.29) खटल्याच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने न्यायालयाने सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे सूचित केले असताना प्रमुख संशयितांनी यंत्रणेलाच हाताशी धरून जिल्हा रुग्णालयात बस्तान मांडले, तेथून फिर्यादी मनोज पाटील यांना धमकावण्यात आल्याचा तक्रारी अर्ज फिर्यादीने न्यायालयात सादर केला होता. सोबत "सकाळ'ने 30 सप्टेंबरला केलेल्या "स्टींग ऑपरेशन'चे कात्रणही न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्या. हिवसे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांना काल फटकारुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

कारागृह, सिव्हिलची "मिलीभगत' 
जिल्हा कारागृहातील फार्मासिस्टचे पद रिक्त आहे. परिणामी, मोठ्या गुन्ह्यातील बंदिवान आपले वजन वापरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरला अगोदर "मॅनेज' करतात. त्यानंतर कारागृहातून "सिव्हिल'मध्ये पाठविण्याची फिल्डींग लावली जाते. हा सर्व आर्थिक व्यवहार करणारा खास व्यक्ती राजकीय मंडळींचा मोठा कार्यकर्ता असतो.. प्रत्येक केससाठी 20 ते 50 हजारांपर्यंतचे दर ठरलेले आहेत. सिव्हिल, कारागृह असो की, गार्ड ड्यूटीवरील पोलिस.. अशा सर्वांचे खिसे गरम केले की, सिव्हीलच्या कैदीवॉर्डात निवांत महिने दोन महिन्यांची सोय होते. 

माजी नगराध्यक्षाचा रुबाब 
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष "सकाळ'च्या स्टींग ऑपरेशन दरम्यान कॅमेरात कैद झाले होते. त्यांच्या एका हातात सिगारेट, खिशात मोबाईल आणि एरंडोलच्या वाळूमाफियासोबत गच्चीवर निवांत चर्चेची मैफल जमलेली असताना टिपण्यात आले होते. तेव्हा.. "सकाळ'च्या छायाचित्रकारांना संपर्क करून या मंडळींनी आर्थिक प्रलोभनही दिले, दबाव आणण्याचा प्रयत्नही केला.. मात्र, उपयोग झाला नाही. 

पोलिसाची बोटचेपी भूमिका 
"सकाळ'च्या स्टींगनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गार्ड ड्यूटीवरील दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी लावून हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. मात्र, त्या चौकशीलाही दोघे पोलिस गैरहजर राहिले होते. नंतर हे प्रकरण लालफितीत दाबले गेले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital police relaxing in ward sakal sting