धुळीनेच जळगावकर बेजार! 

jalgaon dust
jalgaon dust

जळगाव : वातावरणात बदल झाल्यानंतर आजार तोंड वर काढतात. व्हायरल इन्फेक्‍शनने लहानांपासून मोठ्यापर्यंत सारेच हैराण होतात. सद्य स्थितीला दोन- तीन दिवसानंतर वातावरणात बदल होत असला, तरी वातावरण बदलापेक्षा शहरातील रस्ते आणि महामार्गावर उडणाऱ्या धुळीने जळगावकर बेजार झाले आहेत. 
चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या किटकजन्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले होते. परंतु सद्य:स्थितीला मलेरिया या आजाराचा एक देखील रुग्ण आढळून येत नसल्याचा दावा शासकीय आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. शिवाय, चिकुनगुनिया या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील कमी झाले आहेत. मुळात बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. व्हायरल इन्फेक्‍शनमुळे सर्दी, ताप, टायफाईडचे रुग्णांची गर्दी रुग्णालयांमध्ये पाहण्यास मिळते. परंतु हे रुग्ण सध्या नसले तरी, धुळीने उद्‌भवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 

छातीतील त्रास वाढले 
जळगावातील रस्त्यांवरून वाहन धावत असताना त्या मागून उडणाऱ्या धूळ मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहे. श्‍वास घेताना धुळीचे कण आत जात असल्याने छातीचे आजार वाढले आहेत. प्रामुख्याने छातीत दुखणे तसेच छातीत कफ निर्माण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढली आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये निम्मेहून जास्त रुग्ण छातीच्या आजाराचे आहेत. या व्यतिरिक्‍त धुळीची ऍलर्जी होऊन सर्दीचा त्रास होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 

औषधी घेण्याचे दिवसही वाढले 
गेल्या काही महिन्यांपासून धुळीच्या त्रासामुळे बेजार झालेल्या जळगावकरांना धुलीकणांनी वेढून ठेवले आहे. धुळीने त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी डॉक्‍टरकडे गेल्यानंतर तीन- चार दिवसांच्या औषधांच्या कोर्समध्ये रुग्णाला फरक जाणवत नाही. त्रास कायम राहत असल्याने साधारण आठ- दहा दिवसांची औषधी द्यावी लागत आहे. म्हणजेच डॉक्‍टरांकडील औषधाने लवकर फरक पडत नसल्याने औषधी घेण्याच्या दिवसांमध्ये देखील वाढ झाली आहे. 

"कोरोनाव्हायरस'च्या दृष्टीने सज्जता 
"कोरोनाव्हायरस'चा एक रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. जळगावमध्ये किंवा महाराष्ट्रात याची लागण नसली तरी शासकीय आरोग्य यंत्रणेला कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड अतिरिक्‍त ठेवण्यात आले आहेत. 

"कोरोनाव्हायरस आजाराची लागण आपल्याकडे अद्याप नसली तरी त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज आहे. शिवाय बदलत्या वातावरणामुळे सर्दी, कफचा आजार असलेले रुग्ण अधिक वाढल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.' 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय. 

"वातावरणातील बदलापेक्षा जळगावकरांना धुळीचे आजार झालेले रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. यात प्रामुख्याने छातीत कफ आणि ऍलर्जीची सर्दीच्या रुग्ण 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.' 
- डॉ. नरेंद्र जैन, एम.डी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com