मुख्यमंत्री आले पण... कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्‍न ठेवून गेले! 

संजयसिंग चव्हाण
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

एकदा निश्‍चित झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळ दौरा रद्द झाला. त्यानंतर आजच्या दौऱ्यावर अनिश्‍चिततेचे सावट होते, मात्र रात्री उशिरा दौरा आला अन्‌ गेल्या महिन्याभरापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले. मुख्यमंत्री एकदाचे आले, पण.. कार्यकर्त्यांच्या विशेषतः: खडसे समर्थकांच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तर मोघम स्वरूपात का होईना न देताच ते निघून गेले. 
........ 

एकदा निश्‍चित झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळ दौरा रद्द झाला. त्यानंतर आजच्या दौऱ्यावर अनिश्‍चिततेचे सावट होते, मात्र रात्री उशिरा दौरा आला अन्‌ गेल्या महिन्याभरापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले. मुख्यमंत्री एकदाचे आले, पण.. कार्यकर्त्यांच्या विशेषतः: खडसे समर्थकांच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तर मोघम स्वरूपात का होईना न देताच ते निघून गेले. 
........ 
गेल्या महिनाभरापासून खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे व सर्व सहकारी नगरसेवक पदाधिकारी असे सुमारे पाचशे कार्यकर्ते चाळीस समित्यांच्या माध्यमातून रक्षा खडसे यांच्या "समर्पण' या कार्यवृत्तांताचा प्रकाशन सोहळा व त्याचबरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनासाठी राबले. 
खडसे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याच निमंत्रणावरून कार्यक्रमाला येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. 21 फेब्रुवारीची पहाट उजाडेपर्यंत दौऱ्याबाबत शंका होती. गेल्या वर्षी 30 मार्चला दीपनगर येथे 660 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्‌घाटनास मुख्यमंत्री येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला त्यांनी येणे टाळले. यावेळी रात्रीच्या घटकेपर्यंत येण्याची शाश्वती नव्हती. मात्र, आले एकदाचे. 
आमदार सावकारे यांनी प्रास्ताविकात "देर लगी आने में तुमको, शुकर है फिर भी आये तो' या विजयपथ चित्रपटातील गाण्याच्या लाइन्स सांगून भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकत, त्यांना डोळ्यातून उत्तर दिले.. 
गेल्या सहा महिन्यात जळगाव जिल्ह्याचे राजकारण मोठ्या गतीने सरकले रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा आमदार हरिभाऊंना दिली जाईल, अशी चर्चा होती तर पक्षानेच अनुलोम या त्रयस्थ एजन्सीद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे, खासदार पूनम महाजन यांच्यासह रक्षा खडसे यांचेही अकार्यक्षम खासदारांच्या यादीत नाव आले होते. तशा प्रकारच्या बातम्या सर्व टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रे व समाज माध्यमातून व्हायरल होत होत्या. या सर्व्हेनुसार या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

कार्यअहवाल प्रकाशनाचे निमित्त 
तेव्हापासून खासदार खडसे यांनी आपल्या कार्याला गती दिली व त्या सर्वत्र लहान-मोठ्या कार्यक्रमातही दिसू लागल्या. स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या संकल्पनेनुसार लोकप्रतिनिधीने केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेपुढे सादर करावा, हा विचार या अनिश्‍चिततेतून पुढे आला व रक्षा खडसे यांच्या विकासकामाचा वृत्तांत "समर्पण' या या पुस्तिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व जनतेपुढे ठेवण्यात आला. 

प्रश्‍नांच्या उत्तराचे काय? 
जमलेला मोठा समुदाय व खुद्द पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात नाथाभाऊंबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, या गहन प्रश्‍नासह रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबतही प्रश्‍न होताच. सभेत खडसे भाषणाला उठल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जयघोष केला. या समर्थकांना शांत करावे लागले. तेव्हा मुख्यमंत्री खडसेंबाबत काहीतरी भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा व त्यासंबंधी प्रश्‍नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून मिळालेच नाही. अर्थात, खडसेंनी त्यांच्या भाषणात विविध प्रकल्प व योजनांचा पाठपुरावा केल्यानंतर कृषी विद्यापीठ व पोलिस प्रशिक्षण केंद्राचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान, रक्षा खडसेंच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी आमच्या खासदारांना याआधी आशीर्वाद दिलाच आहे, यापुढेही असू द्या, अशी मुख्यमंत्र्यांची विनंती रक्षाताईंसाठी "सकारात्मक' मानली जात आहे. 
-

Web Title: marathi news jalgaon cm fadnvis shinhasan