कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून आता नेत्रपेढी स्थापणार : डॉ. भावना जैन 

कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून आता नेत्रपेढी स्थापणार : डॉ. भावना जैन 

जळगाव : अन्य मोठ्या शहरांमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे डोळ्यांचे हॉस्पिटल असावे, या मोठ्या भाऊंच्या (कै. भवरलाल जैन) आशीर्वादातून कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्याधुनिक यंत्रणेसह जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली "कांताई'त उपलब्ध आहेत. चार वर्षांत जवळपास तेरा हजार रुग्णांवर डोळ्यांची विविध प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, मोठ्या भाऊंचे स्वप्न साकार होत आहे.. भविष्यात याच हॉस्पिटलचा भाग म्हणून नेत्ररोपणासाठी नेत्रपेढी सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन यांनी दिली. 

 क्‍लिक करा - शहरात आठ केंद्रावर 26 जानेवारीपासून "शिवभोजन' ​
प्रश्‍न : कांताई नेत्रालय सुरू करण्याचा उद्देश सफल झाला का? 
डॉ. भावना :
सन 2016 मध्ये भवरलाल जैन (सासरे) यांनी जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी डोळ्यांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. जैन कुटुंबात मी (त्यांची सून) नेत्ररोगतज्ज्ञ व रेटिना सर्जन होते. त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून हा विषय मांडला आणि त्यातूनच कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसापासूनच सुसज्ज यंत्रणा व डोळ्यांशी संबंधित सर्व रोगांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी सुरवातीपासूनच हे हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आले. गरीब, गरजू रुग्णांना जास्तीत जास्त सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.. आणि आज चार वर्षांतील या हॉस्पिटलच्या वाटचालीकडे पाहिले असता त्यांची ती इच्छा, स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसतेय. 

प्रश्‍न : इतर हॉस्पिटल व कांताई नेत्रालयात नेमका फरक काय? 
डॉ. भावना :
डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या व उपचार, त्यावरील शस्त्रक्रियांची सुविधा एकाच छताखाली शक्‍यतो उपलब्ध नसते. त्यासाठी जळगावच्या रुग्णांना याआधी मुंबई, पुणे, औरंगाबादला जावे लागायचे. आता मात्र, कांताई नेत्रालयाच्या स्थापनेपासूनच याठिकाणी सर्व उपचार, शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध आहे. त्यात केवळ मोतीबिंदूच नव्हे तर काचबिंदू, लहान मुलांमधील दृष्टिदोष, तिरळेपणा, रातांधळेपणा, डोळ्यांचा दाब व अन्य स्वरूपाच्या विकारांवर उपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत. 

प्रश्‍न : नेत्रालयाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? 
डॉ. भावना :
2016 मध्ये कांताई नेत्रालय सुरू झाले. पण, अवघ्या चार वर्षांत नेत्रालयाने जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात चांगला लौकिक प्राप्त केलाय. कुठल्याही प्रकारची जाहिरात वा अन्य प्रसिद्धी न करता नेत्रालयाचे नाव खानदेशात तळागाळात पोचले आहे. नेत्रालयात सहा तज्ज्ञ डॉक्‍टरसह शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), वॉर्ड व नर्सिंग अशा विविध विभागात सुमारे 50 सहकारी कार्यरत आहेत. जिल्हाभरातून अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात, तपासणी करतात.. जे गरीब व गरजू आहेत, त्यांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून दिले जातात.. गेल्या चार वर्षांत आतापर्यंत जवळपास 2 लाख रुग्णांची तपासणी व 13 हजार रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया गेल्या चार वर्षांत यशस्वीपणे केल्या आहेत. 

प्रश्‍न : नेत्रालयात कोणत्या सुविधा पुरविल्या आहेत? 
डॉ. भावना :
आमच्या हॉस्पिटलला बऱ्याचदा काही क्‍लिष्ट केसेस येत असतात. अनेकदा अशा केसेसमध्ये शस्त्रक्रिया केल्यास धोका संभवतो. तरीही तज्ज्ञ डॉक्‍टर व आधुनिक यंत्रणेतून या क्‍लिष्ट शस्त्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. "सेव्हन इन वन डायग्नॉसिस डिव्हाईस'सारखे फ्रान्सचे आधुनिक मशिन आहे. लेझर, फेकोसर्जरी यासारख्या शस्त्रक्रियाही उपलब्ध आहेत. अनेकदा डोळ्यांचा दाब, बुब्बुळ, दृष्टीपटल व त्यासभोवतालच्या भागातील सूक्ष्म दोषांची तपासणी करणे कठीण जाते. परंतु, कांताई नेत्रालयात आधुनिक यंत्रणेद्वारे अशाप्रकारची तपासणी होऊन योग्य निदान व प्रभावी उपचार केले जातात. अनेक रुग्णांना त्यातून नवी दृष्टी मिळाल्याने त्यांची या नेत्रालयावर मोठी श्रद्धा आहे. 

प्रश्‍न : नेत्रालयाच्या भविष्यातील प्रगतीबद्दल काही नियोजन? 
डॉ. भावना :
नेत्रालय सुरू केल्यानंतर सुरवातीला त्याठिकाणी ऑप्टिकल व मेडिकल नव्हते. त्यासाठी रुग्णांना तपासणीनंतर अन्य ठिकाणी औषधी व चष्मा घेण्यासाठी जावे लागत असते. अशोकभाऊंना ही समस्या सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ ऑप्टिकल व मेडिकल सुरू करण्यासंबंधी सूचना दिल्या. त्यातून नेत्रालय परिसरात या दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इतर ठिकाणी नेत्रालयाची शाखा सुरू करण्यापेक्षा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना नेत्रालयाचा लाभ कसा मिळवून देता येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील भविष्यात नेत्रालयाचा भाग म्हणून नेत्ररोपण करणारी नेत्रपेढी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. 

डॉ. भावना जैन यांच्याविषयी थोडे.. 
मूळच्या जालना येथील रहिवासी. बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमास "फ्री सीट'ला त्यांचा कोल्हापूर येथील कॉलेजला नंबर लागला. तेथून एमबीबीएस पूर्ण भरुन भावना यांनी सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.एस. केले. रेटिना सर्जन म्हणून स्पेशलायझेशन करताना त्यांनी जालन्यातील गणपती हॉस्पिटलमध्ये सेवा दिली. नंतर मिरज येथे रेटिना विभागप्रमुख म्हणूनही काम पाहिले. रेटिनावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुणी चष्मा वापरलेला डॉ. भावना यांना चालत नाही, त्या रुग्णाने लेन्सच बसवली पाहिजे, असा त्यांचा आग्रह. त्यामुळे काही रुग्णांना त्यांनी स्वत: खर्च करत लेन्स बसवून दिल्या आहेत. जळगावी जैन कुटुंबात विवाह झाल्यानंतर त्या भवरलाल जैन यांचे स्वप्न असलेल्या कांताई नेत्रालयाची धुरा एकहाती सांभाळत आहेत. 

डोळा हा शरीराचा कॅमेरा 
डोळा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा व आवश्‍यक घटक आहे. तो संपूर्ण शरीराचा कॅमेरा आहे. शरीरातील कोणत्याही अवयवातील दोष बऱ्याचदा डोळ्यातून दिसून येतो. त्यामुळे डोळे चांगले, निरोगी राहणे आवश्‍यक आहे. लहान मुलांमध्येही दृष्टीदोषाचे प्रकार अलीकडे वाढल्याचे दिसून येते. त्यामागे त्यांची जीवनशैली कारणीभूत आहे. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरचा नियंत्रित वापर, वापरताना घ्यावयाची काळजी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलं लहानपणी लिहीत-वाचत नसतील तर त्यांना अभ्यासात रस नाही, असा थेट निष्कर्ष न काढता त्यांच्या डोळ्यांमुळे त्यांना स्पष्ट दिसत नाही का? याची तपासणी वेळोवेळी करून घेतली पाहिजे, असे डॉ. भावना आवर्जून सांगतात. 

"आयकेअर ऑप्टिकल'ला पुरस्कार 
कांताई नेत्रालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार व गुणवत्ताप्राप्त चष्मे बनविणारे "आयकेअर ऑप्टिकल' आहे. या चष्मागृहात सर्वप्रकारचे ब्रॅन्डेड काचेचे चष्मे बनविले जातात. चेहऱ्याची ठेवण, डोळ्यांची रचना व प्राप्त नंबर यासंबंधी योग्य व अचूक माप घेऊन प्रोग्रेसिव्ह पद्धतीचे काच टाकून चष्मे बनतात. डोळ्यांशी संबंधित दर्जेदार सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याच्या कार्याबद्दल नुकताच "आयकेअर'ला राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार मिळाला आहे. नेत्रालयाच्या वाटचालीत मोठ्या भाऊंच्या संकल्पनेसोबतच संपूर्ण जैन कुटुंबीयांच्या प्रोत्साहन, मदतीचे योगदान आहे. सुसंस्कृत, सेवाकार्याचा वारसा व परंपरा असलेल्या जैन कुटुंबाच्या सेवाकार्यातील यज्ञात काही समिधा टाकण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान आहे.. असे डॉ. जैन सांगतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com