लॉक "डाऊन' कालावधीत खासगी दवाखान्याचे "शटर' डाऊन नको : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

आय.एम.ए.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. "कोरोनो'मुळे सर्व जिल्हा लॉक डाऊन आहेत. त्यात अत्यावश्‍यक सेवांना वगळले असले तरी नर्सिंग स्टाफ, कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात सेवेसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बहुतांश खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवली आहे.

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश सर्वच डॉक्‍टरांनी खासगी रुग्णालये बंद केली आहेत. जिल्ह्यात सर्व लॉक डाउन आहे. जिल्हा लॉक डाऊन असताना खासगी रुग्णालयांचे शटर डाऊन नको. डॉक्‍टरांना, त्यांच्या स्टाफला येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवू, मात्र खासगी दवाखाने सुरूच ठेवावीत अशा सूचना जिल्ह्यातील सर्व डॉक्‍टरांना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज केल्या. 
आय.एम.ए.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. "कोरोनो'मुळे सर्व जिल्हा लॉक डाऊन आहेत. त्यात अत्यावश्‍यक सेवांना वगळले असले तरी नर्सिंग स्टाफ, कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात सेवेसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बहुतांश खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवली आहे. यामुळे सर्वच रुग्ण जिल्हा रुग्णालयात गर्दी करताहेत. कोरोनो'ग्रस्तांना सेवा द्यायची की सर्वसामान्य आजार असलेल्यांना अशी स्थिती जिल्हा रुग्णालयात निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आय.एम.ए.संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे म्हणाले, की जर साधा थंडी, ताप, खोकल्यासाठी जिल्हा रुग्णालयात रुग्ण येत आहे. सिव्हीलमध्ये गर्दी झाली तर साध्या रुग्णांवर उपचार करायचे की "कोरोना' संशयितांवर असा प्रश्‍न निर्माण होऊन सर्व विस्कळित होईल. तुम्ही दवाखाने सुरू ठेवा. त्यांच्यावर करा. जर कोरोना' सदृष्य लक्षणे आढळली तर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठवा. साध्या रुग्णांवर तूम्ही उपचार नाही केला तर त्यांचा आजार वाढू शकतो. रुग्ण वाढले, आजार वाढला की "रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी स्थिती निर्माण होवू देवू नका. दवाखाने सुरूच ठेवा. 
यावेळी आय.एम.ए.च्या पदाधिकाऱ्यांनी दवाखाने सुरू ठेवायला अडचणींचा पाढाच वाचला. नर्सिंग स्टाफला दवाखान्यात येण्यास अडचणी येतात. रस्त्यात पोलिस अडवितात. वेळेवर येण्यास रिक्षा मिळत नाही. 
जिल्हाधिकारी म्हणाले, की तुम्ही स्टाफला ओळख पत्र द्या. ते त्यांना गळ्यात घालूनच बाहेर पडायला सांगा. त्यांना पोलिस अडविणार नाही. रिक्षा सुरू आहेत. त्या बंद केलेल्या नाही. एकावेळी एकाच रुटवर अधिक कर्मचारी येत असतील तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करू. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवू. दवाखान्यात हातधूण्यासाठी बेसीन बसवा, सॅनिटायझरचा वापर करा, अंतर राखूनच सर्व गोष्टी करायला सांगता, स्टाफला मास्क द्या. 

आय.एम.ए.चे पदाधिकारी म्हणाले, की आम्ही कोरोनो'बाबत शासनाला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत. गरज भासल्यास बेड, व्हेंटिलेटर आम्ही देवू. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, की सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोना'संशयितांसाठी 20 बेडची तयारी आहे. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातही व्यवस्था होते आहे. शहरात विविध ठिकाणी 500 बेडची तयारी आहे. शासकीय वसतिगृहांची पाहणीकरून त्यात व्यवस्था केली आहे. त्या उपरही काही अडचण आली तर खासगी डॉक्‍टरांची मदत घेवू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collector and doctor baithak private hospital open