"कोरोना फायटर्स'ला लागण....डॉक्‍टरसह दोन पोलिस कर्मचारी "पॉझिटिव्ह'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

दोन दिवसांपासून "कोरोना'ची लक्षणे जाणवत असल्याने त्यांना "क्‍वारंटाइन' केले होते. त्यांचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आल्याने वैद्यकीय यंत्रणेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. 

जळगाव: शहरासह जिल्ह्यात "कोरोना'ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. "कोरोना'बाधितांवर उपचार करणारी वैद्यकीय व पोलिस यंत्रणा दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. या दोघा फायटर्सवर "कोरोना'ने अटॅक केला आहे. यामध्ये कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना "कोरोना'ची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांसह डॉक्‍टरांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. 

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात "कोरोना'ग्रस्तांचा आकडा वाढतच असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. "कोरोना'वर मात करण्यासाठी कोविड रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहे. कोविडच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरवरही "कोरोना'ने वार केला असून, कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरला लागण झाली आहे. हे डॉक्‍टर कोविड रुग्णालय परिसरातच वास्तव्यास होते. त्यांना दोन दिवसांपासून "कोरोना'ची लक्षणे जाणवत असल्याने त्यांना "क्‍वारंटाइन' केले होते. त्यांचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आल्याने वैद्यकीय यंत्रणेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. 

मालेगाव बंदोबस्तातील दोघे पोलिस "पॉझिटिव्ह' 
जिल्हा पोलिस दलातील शंभर पोलिस कर्मचाऱ्यांना 25 दिवस मालेगावात बंदोबस्तासाठी तैनात केले होते. हे कर्मचारी गेल्या 11 दिवसांपासून एरंडोल येथे "क्‍वारंटाइन' आहेत. "क्‍वारंटाइन' केलेल्या दोन पोलिसांना "कोरोना'ची लक्षणे जाणवत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यातील दोन जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. 

दोघे जण मुख्यालयातील 
मालेगाव बंदोबस्तासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना "कोरोना'ची लागण झाली आहे. हे दोघे कर्मचारी पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या दीड महिन्यापासून हे दोघे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. पंचवीस दिवस बंदोबस्तात तैनात होते, तर गेल्या अकरा दिवसांपासून बंदोबस्तास असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एरंडोल येथे "क्‍वारंटाइन' करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयातील तीन जणांना आतापर्यंत "कोरोना'ची लागण झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Fighters' pollise ,doctor corona positive