सुरक्षायंत्रणा नसल्याने पोलिसांमध्ये भीती ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

प्रशासनाकडून पोलिसांना कुठल्याचप्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने पोलिसांना आपला जीव मुठीत घेऊन ड्यूटी करावी लागत असल्याची खंत शहरातील पोलिसांनी व्यक्त केली. 

जळगाव : मास्क नाही, सॅनिटायझर नाही, तरी देखील जीव धोक्‍यात घालून दिवसरात्र ड्यूटी करीत आहे. मात्र शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याने पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलिसांच्या ब्रिद वाक्‍याप्रमाणे ते प्रत्येक सण, उत्सव, संकटकालीन परिस्थितीत देशाची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. देशावर कोरोनाचे संकटात देखील संपूर्ण देशभरात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरात 21 दिवसांची संचारबंदी लागू असताना शहरात संचारबंदीकाळात अनेकांना काठीचा प्रसाद देत घरात बसणे भाग पाडले, परंतु शहरात आता कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय प्रशासनाकडून पोलिसांना कुठल्याचप्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने पोलिसांना आपला जीव मुठीत घेऊन ड्यूटी करावी लागत असल्याची खंत शहरातील पोलिसांनी व्यक्त केली. 

आम्ही अत्यावश्‍यक सेवेत नाही का? 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून वैद्यकीय सेवेतील आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण दिले आहे. मात्र दिवसरात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना विम्याच्या संरक्षणातून वगळले आहे. त्यामुळे जळगावातील काही पोलिसांनी आम्ही अत्यावश्‍यक सेवेत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. 

पोलिसांची भूमिका महत्त्वाची 
कोरोनाच्या संकटांमध्ये देखील जळगावातील पोलिसांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेण्यापासून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यापर्यंतची जबाबदारी पोलिस प्रशासन पार पाडत आहे. मात्र याच पोलिसांना प्रशासनाकडून मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा देखील केला जात नसल्याने पोलिसांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 
...तर नोकरी देखील सोडू देऊ 
एका पोलिसाने सांगितले, आम्हाला देखील परिवार आहे, दिवसभर ड्युटीकेल्यानंतर घरी गेल्यावर मनात कुटुंबीयांसोबत राहत असताना मनात कोरोनाची भीती असते. दिवसभर बंदोबस्तात आपल्याला तर कोरोना होणार नाही ना ही भीती सतावत असते. मुले अंगावर खेळायला येतात तेव्हा टाळावे लागते. या महामारीमुळे कुटुंब धोक्‍यात टाकण्यापेक्षा नोकरीच सोडून देऊ अशी भावना जळगावातील एका पोलिसाने कथन केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona police not allow wima policy imargancy service