esakal | सालारनगर, जोशीपेठेतील 7 हजारांवर नागरिकांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaonjalgaon

कोरोनाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कोणीही जाण्यास तयार नसताना महापालिका कर्मचारी याठिकाणी काम करीत आहे. परंतु सालार नगर, बागवान मोहल्ला या परिसरातील नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 
-भारती सोनवणे, महापौर. 

सालारनगर, जोशीपेठेतील 7 हजारांवर नागरिकांची तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण परिसरात रात्रीच कर्फ्यू सदृश परिस्थिती होती. सर्व यंत्रणा खडबडून जागृत झाल्या असून आज सकाळपासून सालारनगरसह आजूबाजूचा परिसर व जोशीपेठेतील सुमारे 7 हजारपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण परिसर निर्जतुकींकरण करण्यात आला आहे. 
चार दिवसांपूर्वीच मेहरुण परिसरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्रीच्या सुमारास उपचारासाठी दाखल झालेल्या 60 वर्षीय संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य, वैद्यकीय यंत्रणेसह जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. दरम्यान या रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसरासह त्या रुग्णाचे गोडाऊनचा संपूर्ण परिसर रात्रीच लॉकडाउन करण्यात आला. आज सकाळी या रुग्णाच्या कुटुंबीय, नातेवाइकांसह त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेण्यासाठी महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या 29 पथके तयार करण्यात आली. या पथकाने सालारनगर ते मासूमवाडी, कासमवाडी यासह संपूर्ण आजूबाजूचा परिसर यासह जोशीपेठ व बागवान मोहल्ल्यातील सुमारे 7 हजारपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी केली. 

परिसराचे निर्जतुकींकरण 
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संपूर्ण परिसर लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने रात्रीच्या सुमारास अजिंठा चौफुलीपासून ते कासमवाडी, मासूमवाडीचा अर्धाकिलोमिटर परिसर व जोशीपेठेचा संपूर्ण परिसर निर्जतुंकीकरण केले. 

संपर्कात येणाऱ्यांची तपासणी 
कोरोनाची लागण झालेल्या त्या रुग्णाच्या कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी महापालिकेच्या पथकाकडून केली जात आहे. यामध्ये काही जणांना ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला या पथकाने दिला आहे. 

नागरिकांमध्ये नाही गांभीर्य 
शहरात दुसरा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीदेखील काही दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात नागरिक टोळक्‍या टोळक्‍याने फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजून देखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. 

तपासणीसाठीही असहकार्य 
कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर याठिकाणच्या परिसरात तपासणीसाठी कोणीही धजावत नसताना देखील महापालिका दवाखाना व आशाप्रवर्तकांचे 29 पथक आपला जीव मुठीत घेऊन तपासणी करीत आहे. मात्र या ठिकाणांवरील नागरिकांकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याची खंत यापथकातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 
 

 

loading image