कोरोनाग्रस्ताची माहिती प्रसारित करणाऱ्यावर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

शहरात काल एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला. या रुग्णाचे नाव व तपासणी अहवाल सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून ही अतिशय गंभीर बाब आहे.

जळगाव : जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नाव व तपासणी अहवाल सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या अज्ञाताविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करुन संबंधितांचा शोध जिल्हा सायबर सेलने तातडीने घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले. 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महा पालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी उपस्थित होते. 

अहवाल सोशल मीडियावर 
शहरात काल एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला. या रुग्णाचे नाव व तपासणी अहवाल सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. असे करणाऱ्याविरुध्द तातडीने गुन्हा दाखल होणे आवश्‍यक आहे. यापुढे याप्रकारची माहिती तसेच अफवा पसरविणारे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. 

पाच रुग्णवाहिकांची सज्जता 
जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी झाली आहे का याबाबतची खात्री करावी. मुंबई व पुण्याहून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोना सदृश काही लक्षणे आढळून येत असल्यास त्यांचीही तातडीने तपासणी करावी. तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुगणालयात 5 रुग्णवाहिका ठेवण्यात याव्यात. संशयितांचे नमुने तपासणीस पाठविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अजून दोन वाहने उपलब्ध करुन द्यावीत, जेणेकरुन तपासणी नमुने तातडीने पोहोच करता येतील. शाहू महाराज रुग्णालयात दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश बंद करण्यात यावात. रुग्णांना चहा, नाश्‍ता व जेवण देण्याची व्यवस्था करावी. 

तर सिंधी कॉलनीतील मार्केट बंद 
पोलिसांनी भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या जमा करु नये. गर्दी टाळण्यासाठी आवश्‍यकता भासली तर सिंधी कॉलनीतील मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. दुधाचे भाव कमी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. तेव्हा शासन दरापेक्षा दुधाचे भाव कमी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. 

पालकमंत्र्यांचे आवाहन 
जिल्ह्यातील जनतेला जीवनावश्‍यक वस्तूंची कुठलीही कमतरता पडणार नाही. तेव्हा घाबरू नका, पण जागरूक रहा. लॉकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अनावश्‍यक प्रवास टाळा. प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी आहे. आपण सहकार्य करा. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona positive case report social media viral fir