"कोरोना'चा जळगावात दुसरा "पॉझिटिव्ह' रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

मेहरुणनंतर आता महामार्गाच्या अलीकडेच सालारनगर भागातील रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याच परिसराच्या आजूबाजूला देखील दाट वस्ती असल्याने आतापर्यंत हा रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे.

जळगाव : शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीत वास्तव्यास असलेला आणखी एक रुग्ण कोरोना "पॉझिटिव्ह' आढळला आहे. मेहरुणनंतर आता त्याच दाट लोकवस्तीजवळ असलेल्या सालारनगर भागातील रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणेची जबाबदारी आणखी वाढली आहे. 
अवघ्या तीनच दिवसांपूर्वी (28 मार्च) शहरातील मेहरुण परिसरात "कोरोना'बाधित एक रुग्णाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला होता. त्याच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात आलेल्या 24 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी कोणाही पॉझिटिव्ह आढळले नाही. मात्र, खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसांसाठी क्‍टारंटाइन करण्यात आले आहे. मेहरुणनंतर आता महामार्गाच्या अलीकडेच सालारनगर भागातील रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याच परिसराच्या आजूबाजूला देखील दाट वस्ती असल्याने आतापर्यंत हा रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे. याबाबतची माहिती प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ 
महाराष्ट्र "कोरोना'च्या तिसऱ्या फेजमध्ये प्रवेश करत असताना जळगाव शहरात "कोरोना'च्या रुग्णाच्या संख्येत वाढ होणे. भीतीदायक आणि तेवढेच काळजी करण्यासारखे आहे. आज पुन्हा "कोरोना'च्या संशयित रुग्णाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 

पायी चालणेही जिकरीचे 
शहरात "कोरोना'चा जो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तो अत्यंत दाटवस्ती असलेल्या परिसरात वास्तव्यास आहे. ज्या भागात पायी चालणे देखील जिकरीचे असते, अशा भागातील हा रुग्ण असून, आतापर्यंत हा रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असून, त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांकडून संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवीत टोळक्‍याने उभे राहणे, दुचाकीने सर्रास वावर करणे करीत असल्याचे चित्र दिसून आहे. तसेच आज "कोरोना'चा दुसरा रुग्ण शहरात आढळून आल्याने पोलिस प्रशासनाने आतातरी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा लागून आहे. 
 
पथक धडकले सालारनगरात 
मलेरिया विभागासह महापालिकेचे पथक रात्रीतून सालारनगरात दाखल झाले. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती संकलित करून त्यांना रुग्णालयात पाठविण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona positive second case city