esakal | "कोरोनो'चा अहवाल लवकर द्या--शरद पवार 

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यातील "कोरोना' संशयितांचा अहवाल उशिरा येण्याबाबत त्यांनी मांडलेल्या तक्रारीची दखल घेऊन शरद पवार यांनी अहवाल लवकर देण्याबाबत आपण सूचना करणार असल्याचे सांगितले. 

"कोरोनो'चा अहवाल लवकर द्या--शरद पवार 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी "कोरोना'ची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे. जळगाव येथील राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले यांच्याशी संपर्क करून त्यांनी संवाद साधला. त्यावेळी जिल्ह्यातील "कोरोना' संशयितांचा अहवाल उशिरा येण्याबाबत त्यांनी मांडलेल्या तक्रारीची दखल घेऊन शरद पवार यांनी अहवाल लवकर देण्याबाबत आपण सूचना करणार असल्याचे सांगितले. 
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी काल (ता. 16) सायंकाळी शरद पवार यांना दूरध्वनी केला होता. तेव्हा बोलणे झाले नाही. मात्र, आज सकाळी शरद पवार यांनी स्वत: देसले यांना दूरध्वनी करून संवाद साधला. यावेळी योगेश देसले यांनी सांगितले, की जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल संशयित रुग्णांचे कोरोना तपासणीचे अहवाल पाच दिवस उशिरा येत आहेत. त्यामुळे रुग्णांवर उशिरा उपचार होत असून, तो दगावण्याची शक्‍यता वाढते आहे. तसेच जळगाव शहरात 50 संशयित रुग्ण असल्याची माहिती देत असता पवारांनी त्यांना थांबविले. जळगावची माहिती अपडेट करीत पवार म्हणाले, जळगावात 57 संशयित आहेत. चार दगावले आहेत. ग्रामीणमध्ये अमळनेर वगळून स्थिती बरी आहे. तरी सुद्धा जळगावात संशयित रुग्णांची लवकर तपासणी अहवाल यावेत, याच्या सूचना मी देतो. 
देसले यांनी दुसरा मुद्दा मांडला, की आरोग्य विभाग पदे भरणार आहेत. ही पदे भरताना एनएचएम (नॅशनल हेल्थ मिशन) च्या करारावरील कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. यावर पवार यांनी विचारले, "सध्या ही मंडळी कुठे आहे?' त्यावर देसले म्हणाले, "साहेब हे सर्व कर्मचारी सध्या गावांवर नेमणुकीच्या ठिकाणी सेवा देत आहे.' यावर ते म्हणाले "ठीक' आहे. अगदी सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार थेट संपर्क करतात, हा अनुभव नक्कीच लक्षात घेण्याजोगा आहे, असे मत योगेश देसले यांनी व्यक्त केले.