कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याचठिकाणी अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

जळगाव : जिल्ह्याच्या काही भागात कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत नागरिक सहभागी होत असल्याने संसर्ग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून दुदैवाने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू जेथे होईल त्याचठिकाणी अग्निसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

नक्‍की पहा - भुसावळात सारी आजाराने एकाचा मृत्यू; मृतदेहाची अवहेलना*
 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते. 

लक्षणे आढळल्यास उपचार घ्या 
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. अनेक नागरिक उशिरा उपचारासाठी येत असल्याने दगावत आहे. याकरिता जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास विशेषतः: ताप असल्यास व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने नजीकच्या डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.. ढाकणे यांनी केले आहे. 

भीती न बाळगता उपचार घ्या 
जिल्ह्यातील रुग्णांवर वेळेत चांगले उपचार व्हावेत याकरिता सर्व सुविधायुक्त खासगी रुग्णालये, तसेच रेल्वेचे रुग्णालयही अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता कोविड रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. 

ट्रेसिंग, ट्रॅकिंगवर भर 
जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य, युनानी, होमिओपॅथी डॉक्‍टर यांचेकडे येणाऱ्या रुग्णांना कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास रुग्णास त्वरित जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे अमळनेर, भुसावळ व जळगाव शहरातील आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या शहरातील नागरिकांच्या ट्रेसिंग व ट्रॅकिंगवर भर देण्याचे आदेश डॉ. ढाकणे यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus death body not allow raletive Funeral