महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

शासनासोबत आपणही उभे राहून व्हायरस थांबविण्यासाठी राज्यातील सर्व सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व दुकानदार संघटनांनी मिळून घेतला आहे. 

जळगाव : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार अधिकच वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, लोकांशी थेट संपर्क येत असल्याने या विषाणूचा फैलाव वाढू नये; यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहे. शासनासोबत आपणही उभे राहून व्हायरस थांबविण्यासाठी राज्यातील सर्व सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व दुकानदार संघटनांनी मिळून घेतला आहे. 

हेपण पहा - coronavirus भारतात येण्याची ओढ; बाहेर परिस्थिती विदारक! 

कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सलून व्यवसायिकांनी 21 ते 23 मार्चपर्यंत सर्व सलूनचे दुकान बंद करण्यासंदर्भातील निर्णयाचे पत्र आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी काढले आहे. त्यामुळे उद्यापासून (ता.21) सोमवारपर्यंत राज्यातील सर्व सलून दुकाने हे बंद राहणार आहे. 

थेट संपर्क असल्याने निर्णय 
सलून दुकानदार दररोज अनेक लोकांच्या संपर्कात येतात. एक फूट अंतरावर राहून ग्राहकांची कटींग- दाढी करावी लागते. त्यामुळे सलुन व्यावसायिक व कारागिरांना विषाणूंची लागण होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार अधिक वाढू नये; यासाठी दक्षता म्हणून राज्यातील सर्व सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय नाविक महामंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार नाभिक समाजातील सर्व सलून व्यवसायिकांनी असले दुकाने 21 ते 23 मार्च पर्यंत बंद ठेवून शासनाचा कोरोना मोहिमेच्या लढाईत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ कडून करण्यात आलेले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus effect nabhik mahamandal decision 23 march shop closed