coronavirus भारतात येण्याची ओढ; बाहेर परिस्थिती विदारक! 

अंकुश सोनवणे
शुक्रवार, 20 मार्च 2020

सरकारने सुटी जाहीर केलीय. बाहेर जाण्यासाठीही बंदी घातली आहे. ठराविक वेळेसाठी मेडिकल खुले केले जातात. तेव्हा कुटुंबातील एकालाच बाहेर पडून खरेदी करावी लागतेय. स्थिती विदारक असली तरी पालकांनी काळजी करू नये. आम्ही सुखरूप आहोत,

जळगाव :  "कोरोना'ने जागतिक कहर पसरवलाय. फिलिपीन्समध्येही विदारक स्थिती असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सरकारने सुटी जाहीर केलीय. बाहेर जाण्यासाठीही बंदी घातली आहे. ठराविक वेळेसाठी मेडिकल खुले केले जातात. तेव्हा कुटुंबातील एकालाच बाहेर पडून खरेदी करावी लागतेय. स्थिती विदारक असली तरी पालकांनी काळजी करू नये. आम्ही सुखरूप आहोत, अशी भावना जळगावच्या श्रद्धा पाटीलने व्यक्त केलीय. श्रद्धासह जवळपास तीनशेवर विद्यार्थी फिलिपीन्समध्ये शिक्षण घेत असून, त्या ठिकाणी अडकलेत. याबाबत श्रद्धाने "सकाळ'कडे तिचे तेथील अनुभव विशद केले. 

हेपण पहा - आठ वर्षापासून बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात "कोरोना'... तरी नवीन कसा!

आई-बाबा काळजी नको 
"कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांची चिंता वाढली आहे. त्यात विदेशात असलेल्या आपल्या मुलांशी बोलताना योगशिक्षिका डॉ. अनिता पाटील व सतीश पाटील हे भावनिक झाले. त्यावेळी श्रद्धा घरच्यांना धीर देताना "चिंता करू नका, घाबरून जाण्याचे कारण नाही. या परिस्थितीशी धैर्याने सामोरे जायला हवे. आम्ही काळजी घेत आहोत, तुम्हीही घ्या, अशा शब्दांत धीर देण्याचे काम केले. सध्या घराबाहेर जाणे बंद आहे, घरात बसून सर्व परिस्थिती बघतोय. 

भावनिक होऊन निर्णय नको 
भारतात यायचे पण आता भावनिक होऊन चालणार नाही. निर्णय जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. भारतात जात असताना अनेक लोकांशी संपर्क होईल त्यातून प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता जास्त आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे धोक्‍याचे असल्याने सध्या या शहरात राहून स्वतःची काळजी घेतोय. सध्या सतर्क राहणे गरजेचे आहे, आणि ती सतर्कता आम्ही सर्वजण बाळगतोय. 

घराबाहेर एकाच व्यक्तीला जाता येते 
तेथील अनुभवाबाबत श्रद्धा म्हणाली, की शहरात प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. ठराविक वेळेसाठी मेडिकल व सुपर मार्केट खुली केली जातात. या कालावधीत फक्त घरातील एकच व्यक्‍ती बाहेर जाऊ शकते. त्यानंतर शहरात रस्त्यावर कोणीही दिसल्यास त्याला दंड आकारण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःला शिस्त लावली असल्याने परिस्थिती आतातरी नियंत्रणात आहे. 

वाहतूक व्यवस्था बंद 
फिलिपिन्समध्ये सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. जागोजागी चेक पॉइंट लावण्यात आलेत. नागरिक देखील नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळे परिस्थिती लवकर आटोक्‍यात येईल. भारतात देखील नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे सरकार करेल यापेक्षा स्वतः पुढे यायला हवे, असे आवाहनही श्रद्धाने केले. 

फिलिपीन्समध्ये तीनशे विद्यार्थी 
जगभरात अनेक भारतीय व्यवसाय, उद्योगानिमित्त स्थायिक झाले आहेत. तर अनेक विद्यार्थी तिथे उच्च शिक्षणासाठीही गेले आहेत. फिलिपीन्समध्ये तीनशेवर विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथील "नागा' व "लिग्झपी' शहरात प्रत्येकी 150 असे विद्यार्थी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus isseu medical students philipins country