"कोरोना'चा उच्चभ्रू वस्तीत शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

जिल्हाभरातील "स्वॅब' घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 26 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आले असून, आठ व्यक्तींचे तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहे. "

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या "व्हायरस'ने आता उच्चभ्रू वस्तीतही शिरकाव केला आहे. जिल्ह्यात आज आठ रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळून आले आहेत तर तिघांचा मृत्यू झाला. "कोरोना'बाधितांची संख्या आता 180 वर पोहोचली असून, मृतांचा आकडा 25 झाला आहे. 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील पाच, भुसावळमधील तीन व चोपड्यातील एकाचा समावेश आहे. 
जिल्हाभरातील "स्वॅब' घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 26 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आले असून, आठ व्यक्तींचे तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहे. "पॉझिटिव्ह' आलेल्या रुग्णांपैकी 49 वर्षीय महिला व उर्वरित चार रुग्ण नवीन भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विद्यार्थ्याला लागण 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय "कोव्हिड'साठी अधिग्रहीत करण्यात आले असल्याने "गोदावरी' रुग्णालय हे शासकीय रुग्णालय म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. या रुग्णालयातील 23 वर्षीय विद्यार्थ्याला "कोरोना'ची लागण झाली आहे. 

दोघे रुग्ण उच्चभ्रू वस्तीतील 
"पॉझिटिव्ह' आलेल्या रुग्णांमध्ये 79 वर्षीय वयोवृद्ध ओंकारनगरातील तर 32 वर्षीय महिला प्रतापनगरातील असल्याचे समोर आले आहे. हे दोघे रुग्ण उच्चभ्रू वस्तीतील असल्याने याठिकाणी देखील "कोरोना'ने शिरकाव केला आहे. त्यामुळे शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये देखील वाढ झाली असून, नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. 

दिवसभरात "कोरोना'चे तीन बळी 
कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन "कोरोना'बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चोपडा येथील 55 वर्षीय महिला, जळगावातील 55 वर्षीय व 50 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. 50 वर्षीय प्रौढाचा अहवाल सोमवारी (ता. 10) पॉझिटिव्ह आला असून ते हायवे दर्शन कॉलनीतील रहिवासी असल्याचे समोर आहे. तसेच हे मृत व्यक्ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षक असल्याने त्यांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आजपर्यंत 25 "कोरोना'ग्रस्तांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus high profile aria positive case