"कोरोना' प्रतिबंधासाठी "थ्री लेअर' पद्धती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

य वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे अमळनेर व पाचोऱ्याप्रमाणे जळगाव व भुसावळमध्ये तपासणी मोहीम प्राधान्याने राबवा. यासाठी "कोरोना'बाधित रुग्णांच्या संपर्कातील "हायरिस्क'मधील व लोरिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा

जळगाव : अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे "कोरोना'बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींबरोबरच त्या व्यक्तींच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध (थ्री लेअर पद्धत) घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने तपासण्यात आले त्याच धर्तीवर जळगाव, भुसावळच्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पद्धत वापरा, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज संबंधित यंत्रणेला दिल्या. 
जिल्ह्यात "कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. 
डॉ. ढाकणे म्हणाले, की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे अमळनेर व पाचोऱ्याप्रमाणे जळगाव व भुसावळमध्ये तपासणी मोहीम प्राधान्याने राबवा. यासाठी "कोरोना'बाधित रुग्णांच्या संपर्कातील "हायरिस्क'मधील व लोरिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. लोरिस्कमधील व्यक्तीमध्ये लक्षणे असल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणीस पाठवावे. जिल्ह्यात "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी गावातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

कापूस केंद्र बंद करू नये 
जिल्ह्यातील कापूस विक्रीसाठी "सीसीआय'मार्फत केंद्र सुरू करण्यात येत आहे. याठिकाणी प्रत्येक दिवशी किमान 50 शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर टोकन देऊन कापूस खरेदी करावी. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घेतल्याशिवाय केंद्र बंद करू नये. मका व ज्वारी खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात येणार त्याठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये, तसेच व्यापारी मालाची कटाई जास्त करणार नाही, यासाठी सहकार व पणन विभागाने प्रत्येक तालुक्‍याच्या सहकार अधिकाऱ्यास उपस्थित राहून तपासणी करण्याचेही निर्देश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus prevention three leyar sestym