जिल्ह्यात गर्दीला "टाळे' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा वगळता बंद राहणार आहेत. परीक्षेमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागणार आहे. 

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा वगळता बंद राहणार आहेत. परीक्षेमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागणार आहे. 

महाविद्यालयांनाही 31 पर्यंत सुटी 
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व शैक्षणिक प्रशाला व संलग्न महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज 16 ते 31 मार्च या कालावधीपर्यंत बंद राहणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही पवार यांनी रविवारी (ता. 15) परिपत्रक जारी केले आहे. तथापि इतर शैक्षणिक कामकाज सुरू राहणार असल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत विद्यापीठाच्या असलेल्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. 
 
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी 
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्‍यक ती सर्व खबरदारी घ्यावी. या काळात परीक्षा नसेल, असे विद्यार्थी वसतिगृह अधीक्षकांच्या अनुमतीने आपल्या मूळ गावी जाऊ शकतात. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्‍यक ती दक्षता प्राचार्य, संचालक व विभागप्रमुख यांनी घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

वसतिगृहातील स्वच्छतेवर भर 
मू. जे. महाविद्यालय व बेंडाळे महिला महाविद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांची परीक्षा व प्रात्यक्षिके सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच राहणे पसंत केले आहे. तरीदेखील ज्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने आपल्या घरी जावयाचे असेल त्यांनी महाविद्यालयाची परवानगी घेऊन जाता येणार आहे. दरम्यान, "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर वसतिगृहात स्वच्छतेवर भर दिली जात असून विद्यार्थ्यांनाही याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जात असल्याचे वसतिगृह अधीक्षकांनी "सकाळी'शी बोलताना सांगितले. 

शिक्षणाधिकाऱ्यांचे परिपत्रक 
"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत "शाळा बंद' ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने 16 ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील, शहरी व महानगरातील सर्व शाळा मराठी, सेमी, इंग्रजी, सीबीएसईसह सर्व माध्यमाच्या शाळा, कॉलेज (परीक्षेचे कामकाज सोडून) बंद राहणार असल्याचे शासकीय आदेश आज माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, शिक्षण विभाग जि. प. जळगाव यांनी शासनाच्या अंमलबजावणीचे पालन करत परित्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व पं. स. चे गट शिक्षणाधिकारी, मनपा, नगरपालिका, नगर परिषदेच्या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांना (शिक्षण विभाग) सूचना केल्या आहेत. 
 

शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयाला 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रात्यक्षिके वेळेनुसार सुरू राहणार आहेत. दरम्यान, परीक्षा असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात उपस्थिती अनिवार्य आहे. 
- एस. एन. भारंबे, प्राचार्य मू. जे. महाविद्यालय जळगाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus school collage close 31 march