कोरोना व्हायरस….आर्याने लावले बाहुलीचे लग्न, तर गुणगुणने लाटल्या पोळ्या 

योगेश महाजन
मंगळवार, 24 मार्च 2020

शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, विविध कार्यालये इतकेच नाही तर सर्वांच्या विश्वासाचे केंद्रस्थान असलेली सर्वधर्मीय धार्मिक स्थळही बंद करण्यात आली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेने बाहेर न जाता घरुनच कामकाज करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी झाली आहे. 

अमळनेर : मैत्रिणीच्या रुचाने कालच बाजारातून वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी" बिकमिंग " मिशेल ओबामा यांच पुस्तक ऑनलाइन मागवलय.. आर्याने स्वतःच्या बाहुलीच लग्न तिच्या मैत्रिणीच्या बाहुल्याशी कालच उरकून घेतलय..गुणगुणने लाटल्या पोळ्या.. अशा प्रकारे घरातच बसून आनंदी राहण्याचा मंत्र देताहेत येथील शिक्षिका मंगल नागरे- देशमुख... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच कुटुंबासमवेत आनंदी राहण्याची ही एक संधी असून, शासनाच्या आदेशाचेही पालन करावे, असे आवाहन श्रीमती देशमुख यांनी केले आहे. 

घरूनच कामकाज करावे 
चीन, इरान, इटली या देशासंबंधी 'कोरोना'नावाच्या विषाणूची चर्चा वर्तमानपत्रातून, दूरचित्रवाणीतून व इतर माध्यमातून ऐकत आणि बघत होतो. बघता बघता कोरोनाने भारतातही शिरकाव करून प्रसार झाला. सततच्या कानावर आदळणाऱ्या बातम्यांमुळे संपूर्ण जग हादरले आहे. शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, विविध कार्यालये इतकेच नाही तर सर्वांच्या विश्वासाचे केंद्रस्थान असलेली सर्वधर्मीय धार्मिक स्थळही बंद करण्यात आली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेने बाहेर न जाता घरुनच कामकाज करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी झाली आहे. 

कुटुंबासमवेत घालवावा वेळ 
व्हॉट्सअॅप, फेसबुकवर कोरोनाची भयावहता वाढविणारे कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाली आहेत. यातून चर्चेला आलेले उधाण आणि यातून काढले जाणारे तर्क यांचा आवाका गंभीर स्वरूपाचा आणि भेदरून टाकणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊनची घोषणा करून जमावबंदी लागू करून परिस्थितीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी प्रत्येकाला आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता वाटणे अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी आपण नैतिक जबाबदारीने हा विषय गांभीर्याने घेऊन सर्व कुटुंबाने घरातच थांबून या परिस्थितीला हसतखेळत स्वयंप्रेरणेने, स्वतः साठी, देशासाठी, जगासाठी, मानवतेसाठी सामोरे जाणे उचित व गरजेचे आहे. 'सो इट्‌स नॉट कर्फ्यु इट्स्‌ केअर फॉर यू' या उक्‍तीनुसार पुढील काही दिवस नाईलाजाने का होईना आपण आपल्या कुटुंबासमवेत घरातच राहणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. 

असे राहा आनंदी.. 
घरातल्या भिंतींवर चढलेली जळमट साफ करू, संगीताच्या तालावर विस्कटलेली कपाट व्यवस्थित मांडणी करून ठेवू. त्यात सापडलेले जुने अल्बम काढून स्वतःचे मजेदार फोटो आणि त्यांच्याशी जडलेले मजेदार किस्से मुलांना रंगवून सांगू. इडली, आप्पे, दोसे, कांदाभजी, एढणी, थालीपीठ, शेंगोळे, हांडवे, ढोकळे असे कितीतरी पदार्थ गरमागरम खाण्याची मज्जाच न्यारी, चला तर मग तुमच्या आवडत्या मुव्हीलाही या पदार्थांसोबत अधिक रुचकर बनवू. जुन्या मित्र- मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारा, शाळा- महाविद्यालयाच्या आठवणी काढून गाल दुखेपर्यंत हसा. रंग घ्या, ब्रश घ्या आणि तुमच्या स्वप्नातल विश्व तुम्हांला हव्या त्या रंगांनी कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न करा. चेस खेळा, क्रिकेट खेळा, लंगडी पळापळी आणि आंधळी कोशिंबीर पण खेळा. सकाळी उठल्यावर आपल्या प्रियला अद्रकवाली चाय ऑफर तर करून बघा. आयुष्य किती सुंदर आहे, पण वेळ नसल्यामुळे इनबॉक्स झालय. आपल्याला निसर्गाने हा वेळ यासाठीच तर दिला नसेल ना ?? हा विचार करावा. 

मजेशीर किस्से..
श्रावणीने " तोत्तोचान"पुस्तकाचा एका दिवसात वाचून फडशा पाडडा. संकल्पने स्वतः ची रोबोटीक दुनिया कंपाउंच्या भिंतीवर साकारली आणि कुणालने टेरेरमधल्या सर्व कुंड्यांवर वारली पेन्ट केली. प्रिशाने स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात आईवर निबंधही लिहून काढला. आहे ना मजेशीर तर चला मग कशाची वाट बघताय ? कोरोना व्हायरसवर स्वतःच्या आनंदी कलाकृतींचा अॅन्टीव्हायरस शोधू. घरातून बाहेर न पङता, घरातच आनंदी राहून व्यवस्थापनाला मदत करुयात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus teacher mangla deshmukh massage