दिलासादायक : जिल्ह्यातील प्रलंबित 520 अहवाल "निगेटिव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

राज्यासह जिल्ह्यातही "कोरोना'चा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस "कोरोना'चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व "मनपा' प्रशासनाकडून "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील "कोरोना'ग्रस्तांचा आकडा चारशेच्या जवळपास पोहोचला.

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील जळगाव व भुसावळच्या "स्वॅब' घेतलेल्या 527 संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील 7 जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह', तर उर्वरित गेल्या दोन दिवसांपासून प्रलंबित 520 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले. आज दिवसभरात सर्वाधिक अहवाल "निगेटिव्ह' आल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 
राज्यासह जिल्ह्यातही "कोरोना'चा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस "कोरोना'चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व "मनपा' प्रशासनाकडून "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील "कोरोना'ग्रस्तांचा आकडा चारशेच्या जवळपास पोहोचला. यात सर्वाधिक रुग्ण जळगाव, अमळनेर, पाचोरा, भडगाव, भुसावळ या तालुक्‍यांत आढळून आले. या रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचेही गेल्या दोन दिवसांपासून "स्वॅब' घेण्यात आले असल्याने 21 मेच्या अहवालानुसार जिल्हाभरातील सुमारे 573 जणांचे अहवाल प्रलंबित होते. यातील आज सर्वाधिक म्हणजे 527 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 520 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले. जिल्हाभरात केवळ जळगावातील 1; तर भुसावळातील 6 असे एकूण 7 जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत "कोरोना'ग्रस्तांची संख्या 388 झाली आहे. 

भुसावळातील सर्वाधिक "निगेटिव्ह' 
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्‍यातील सुमारे 251 संशयितांपेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील एका डॉक्‍टरसह इतर पाच जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले. यानंतर सायंकाळी उशिराही भुसावळसह जळगावातील काही संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्येही भुसावळातील सर्वाधिक रुग्णांचे अहवाल "निगेटिव्ह' आले. 

जिल्हाभरात 179 जण बरे 
जिल्हाभरात आतापर्यंत 179 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच 47 जणांचा मृत्यू झाला असून, 162 जणांवर कोविड रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

"पॉझिटिव्ह'च्या संपर्कातील रुग्णाचा वावर 
जिल्हा कोविड रुग्णालयात अमळनेर येथील "पॉझिटिव्ह' रुग्णाच्या कुटुंबातील संशयित रुग्णाला उपचारासाठी दाखल करत नसल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. हा रुग्ण दिवसभर रुग्णालय आवारात फिरत असल्याची माहिती भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी समोर आणून दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus test report pending