esakal | कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा! 

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा! 

चारही बाजूंना काही जिल्हा कोरोना प्रभावित असताना जळगाव जिल्ह्याने अधिक काळजी घेणे अपरिहार्य आहे. त्याची जाणीव जशी आरोग्य व पर्यायाने प्रशासकीय यंत्रणेला असणे अनिवार्य आहे, तशी ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाचीही आहे

कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा! 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : खरेतर गेल्या 18 दिवसांत जळगाव जिल्ह्यात नव्याने एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नव्हता. दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर पहिला रुग्ण बरा होऊन त्याला "डिस्चार्ज'ही मिळाला. मात्र, कोरोनावरील ही मात आरोग्य यंत्रणा व पर्यायाने जळगावकरांसाठी अल्पकाळ समाधान देणारी ठरली. कारण, शनिवारी पुन्हा अमळनेर तालुक्‍यातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा पुन्हा हादरली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे हे द्योतक काळजी वाढविणारे आहे; परंतु या केसच्या निमित्ताने जिल्ह्यातील काही भागांत कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरणारे "सायलेंट कॅरिअर' असण्याची शक्‍यता वाढली असून, आरोग्य यंत्रणेसमोर ते शोधणे मोठे आव्हान ठरणार आहे. 
 
जळगाव जिल्ह्यात 28 मार्चला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आणि यंत्रणा जागी झाली. दोन दिवसांत लगेच दुसरा रुग्ण आढळला व त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणेने पूर्णत: कोरोना नियंत्रणासाठी आवश्‍यक उपाययोजनांवर "फोकस' केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पहिला रुग्ण परवाच बरा होऊन, त्याला "डिस्चार्ज' मिळाला आणि यंत्रणेचे सर्वत्र अभिनंदन होऊ लागले. 

मात्र, असे असले, तरी शेजारच्या धुळे जिल्ह्यातही दोन रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मोठ्या "हॉटस्पॉट' बनलेल्या मालेगावचा जळगावसह धुळ्याशी "कनेक्‍ट' असल्याने सतर्क राहणे गरजेचे होते आणि आहे. तिकडे पूर्वेचे शेजारी बुलडाणा, अकोला जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आहेत. तिकडे दक्षिण- पश्‍चिमेकडील औरंगाबाद जिल्हाही "हॉटस्पॉट' आहे. चारही बाजूंना काही जिल्हा कोरोना प्रभावित असताना जळगाव जिल्ह्याने अधिक काळजी घेणे अपरिहार्य आहे. त्याची जाणीव जशी आरोग्य व पर्यायाने प्रशासकीय यंत्रणेला असणे अनिवार्य आहे, तशी ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाचीही आहे. दुर्दैवाने काही जण मात्र यंत्रणेला यासाठी सहकार्य करण्याच्या अजिबात तयारीत नाहीत. 

कोरोना संसर्गाची काही लक्षणे अगदीच सामान्य असली व ती लक्षातही येत नसली, तरी "ट्रॅव्हल्स हिस्ट्री' अथवा तत्सम व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून क्‍वारंटाइन होत, त्रास होऊ लागताच तपासणीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. नेमके इथेच सर्वकाही चुकतेय, म्हणून संक्रमण होत नसले, तरी असे अधूनमधून रुग्ण समोर येऊ लागले आहेत. 

अमळनेर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्त रुग्ण महिला त्याचाच भाग म्हणावा लागेल. संबंधित रुग्ण महिलेला अथवा तिच्या जवळच्या नातलगांना विदेश प्रवासाची हिस्ट्री नसली, तरी मुंबई, पुणे, औरंगाबाद प्रवासाची पार्श्‍वभूमी आहे. काल- परवा त्रास अधिक वाढला म्हणून हे प्रकरण समोर आले; अन्यथा... आणखी काही दिवस असेच वाया गेले असते आणि पुढे संसर्ग वाढण्याची शक्‍यताही वाढली असती. लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना "सायलेंट कॅरिअर' म्हटले जाते, असे अनेक संशयित देशभरात सर्वत्रच वावरत असतील, नव्हे आहेच. आपल्याकडेही असतील, त्यामुळे या "कॅरिअर'चा शोध मर्यादा असलेल्या यंत्रणेला सहज घेणे शक्‍य नाही. अशा स्थितीत ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, त्यातून कुणालाही अलिप्त राहता येणार नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या संशयितांनी स्वत: तपासणी करून घेणे, ते पुढे येत नसतील तर त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी यंत्रणेला त्याबाबत सतर्क करणे आद्यकर्तव्य ठरते.