"कोरोना'च्या व्यापात मनपा रुग्णालयांची "ओपीडी' सुरू 

भूषण श्रीखंडे
शनिवार, 16 मे 2020

"कोरोना' विषाणू आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्य विभागाकडून ही सुविधा सुरू आहे. 
- डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका दवाखाना विभाग. 

जळगाव : शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेसह महापालिकेच्या आरोग्य तसेच दवाखाना विभागाचा कामाचा ताणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात "लॉकडॉउन' सुरू असल्याने शहरातील खासगी वैद्यकीय सेवा देणारे दवाखाने बंद आहे. अशा कामाच्या अतिरिक्त तणावात महापालिकेच्या सहा रुग्णालयांपैकी काही रुग्णालयात जनरल तपासणीची सुविधा नागरिकांना दिली जात आहे. 

शहरात महापालिकेची सहा रुग्णालये असून, या रुग्णालयांच्या माध्यमातून महापालिकेतर्फे वैद्यकीय सुविधा दिली जाते. परंतु, सध्या गेल्या दीड-दोन महिन्यापासून "कोरोना' विषाणूचा महामारीमुळे सर्वच यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील "कोरोना'बाधित रुग्ण आढळतात, त्या ठिकाणी नागरिकांची चौदा दिवस वैद्यकीय तपासणी घरोघरी जाऊन केली जात आहे. तसेच क्वारंटाइन केलेल्यांची तपासणी, त्यांना वैद्यकीय सुविधा देणे असा महापालिकेच्या दवाखाना विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असा ताण आहे. 

रुग्णालयांमध्ये "ओपीडी' 
महापालिकेच्या सहापैकी काही रुग्णालयांत नागरिकांना जनरल तपासणी सेवा देखील महापालिकेने सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना "लॉकडॉउन'च्या काळात लहान आजारावर कमी दरात उपचार महापालिकेकडून दिला जात आहे. 

तर प्रसूती विभाग "बंद' होणार ? 
शहरात "कोरोना' रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील आलेल्यांना क्वारंटाइन करावे लागत असून, त्यासाठी शहरातील काही ठिकाणी सुविधा केली आहे. परंतु, रुग्णांची संख्या भविष्यात वाढल्यास क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दवाखान्यातील प्रसूती विभाग बंद करून तेथे क्वारंटाइन करण्याची सुविधा केली जाऊ शकते. याबाबत प्रशासन विचाराधीन असून, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. 

वैद्यकीय विभागात कर्मचारी कमी 
महापालिकेच्या दवाखाना विभागात मोठ्या प्रमाणात डॉक्‍टर, परिचारिकांची पदे रिक्त आहेत. यातील काही पदे काही दिवसांपूर्वी करार पद्धतीवर भरली. परंतु, "कोरोना'त वैद्यकीय तसेच अंगणवाडी सेविका असे 200 कर्मचारी देखील अपूर्ण पडत आहेत. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांत काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करून जनरल ओपीडी सेवा दिली जात आहे. 
 
लसीकरण सेवा देखील सुरू 
महापालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत नियमित लसीकरण सेवा आधी सुरू होत्या. त्या सेवा कोरोना विषाणू आजार तसेच "लॉकडॉउन'मध्ये देखील ही सेवा सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे नवजात बालक तसेच लहान मुलांचे नियमित लसीकरण सुविधा सुरू असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation hospital reguler opd open corona fight