जिल्ह्यात उद्यापासून कापूस खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

कापूस विक्रीअभावी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा "सकाळ'ने ठळकपणे मांडल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय झाला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी "सकाळ'चे आभार मानले आहेत.​

जळगाव : जिल्ह्यात रखडलेल्या शासकीय कापूस खरेदीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी "गुड न्यूज' असून, मार्केटिंग फेडरेशनने येत्या सोमवारपासून (ता. 27) जिल्ह्यात पाच केंद्रावर कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे. कापूस विक्रीअभावी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा "सकाळ'ने ठळकपणे मांडल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय झाला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी "सकाळ'चे आभार मानले आहेत. 
गेल्या तीन दिवसांपासून "सकाळ'मध्ये "व्यथा कापूस उत्पादकांची' अशी मालिका सुरू होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे येत्या सोमवारपासून जिल्ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मार्केटिंग फेडरेशनचे झोनल मॅनेजर आर. जी. होले यांनी ही माहिती दिली. धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल, अमळनेर या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू होतील. सर्वच ठिकाणी दररोज 25 ते 30 गाड्या कापूस खरेदी केला जाणार आहे. 

शेतकऱ्यांमध्ये समाधान 

"सकाळ'मुळे न्याय मिळाला 
किशोर चौधरी (असोदा) ः शेतकऱ्यांचा कापूस पडून असल्याच्या बातम्या "सकाळ'ने ठळकपणे प्रसिद्ध केल्या. कापूस उत्पादकांची व्यथा त्यात योग्य प्रकारे मांडून, योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोचवल्या. यामुळे प्रशासनाला कापूस खरेदी सुरू करावी लागली, हे सत्य आहे. हे "सकाळ'च करू शकतो, यामुळे "सकाळ'चे आभार. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आगामी काळातही घ्यावी. 

जीवनात "सकाळ' आणली 
सतीश महाजन (खेडी) ः जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही सीसीआय, मार्केटिंग फेडरेशनतर्फे कापूस खरेदी सुरू नव्हती. "सकाळ'ने कापूस उत्पादकांच्या व्यथा तितक्‍याच तीव्रतेने मांडून सत्य समोर आणले. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्रे सोमवारपासून सुरू होत आहेत. आता शेतकऱ्यांच्या हातात कापूस विकून पैसा येईल. "सकाळ'ने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने "सकाळ' आणण्याचे काम केले आहे. 

विश्‍वासार्ह बातम्या 
कैलास चौधरी (कंडारी, ता. भुसावळ) ः "सकाळ' नेहमी विश्‍वासार्ह बातम्या देतो. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्‍नांबाबत विश्‍वासार्ह बातम्या "सकाळ'ने दिल्या, त्याला तोड नाही. विश्‍वासार्हतेमुळेच शासनाला कापूस खरेदी सुरू करावी लागली अन्यथा अधिकाऱ्यांनी अजून कितीतरी दिवस कापूस खरेदी सुरू केली नसती. 

"सकाळ'ची "जागल्या'ची भूमिका 
राजधर पाटील (शेतकरी, बांबरूड पाटस्थळ, ता. भडगाव) ः "सकाळ' ने खऱ्या अर्थाने "जागल्या'ची भूमिका घेत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. लॉकडाउनमुळे घरात कापूस तसाच पडून आहे. त्यामुळे कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात शासकीय खरेदी केंद्र बंद झाली होती. "सकाळ' ने हा प्रश्न लावून धरल्याने केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त तांत्रिक अडचणी पुढे न करता तातडीने कापूस खरेदी करावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton cci centar kharedi start tommarow