कार्डचा पिनकोड विचारून चाळीस हजारांवर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकेस डेबिट कार्डचा पिनकोड विचारून तिच्या खात्यातून 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येऊन परिचारिकेने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. 

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकेस डेबिट कार्डचा पिनकोड विचारून तिच्या खात्यातून 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येऊन परिचारिकेने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. 
जिल्हा रुग्णालयात कार्यरत परिचारिका संध्या युवराज पाटील (वय 28) यांच्या पगार खात्याच्या डेबिट कार्डचा पिनकोड विचारून सायबर गुन्हेगारांनी तीन टप्प्यात पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संध्या पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईल नंबरवर बॅंकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून एकाचा फोन आला. तुमच्या डेबिट कार्डची मुदत संपत आली असून, तुम्ही पुढेही कार्ड सुरू ठेवायचे असेल तर, कार्डवरील पिनकोड आणि ओटीपी सांगा असे, म्हटल्यावर संध्या पाटील यांनी नंबर सांगताच एका मागून एक तीन वेळेस बॅंक खात्यातून पैसे विड्रॉल करून भामट्यांनी 39 हजार 970 रुपयांना चुना लावला. याबाबत पोलिस ठाण्यात आणि सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून, बॅंकेशी पत्रव्यवहार करून संबंधित खाते ब्लॉक करण्यात आले आहे. 
 
कार्डचे "क्‍लोनिंग' 
एटीएम कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड हे खातेधारकाच्या मोबाईलशी संलग्न असतात. त्या मोबाईलवर फोन करून आधी पिनकोड घेण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन प्रक्रियेंतर्गत कार्डचे "क्‍लोन' करण्यासाठी संबंधित व्यक्तीने प्रोसेस पूर्ण केल्यावर संध्या पाटील यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पासवर्ड (वन टाइम पासवर्ड) मागून कार्ड क्‍लोन करून पैसे लंपास केल्याचा हा प्रकार आहे. 
 
खातेधारकांनो सावधान! 
एटीएम, डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या खातेधारकांना कधीच कोणतीही बॅंक फोन करून माहिती विचारत नाही. पासवर्ड, ओटीपी नंबर तर मुळीच बॅंक अधिकारी कर्मचारी मागणी करीत नाहीत. कोणालाही पासवर्ड सांगू नका, असे संदेश वारंवार संबंधित बॅंका, पोलिस दलातर्फे सांगण्यात येतात. मात्र, तरीसुद्धा सुशिक्षित नोकरदारांचीच फसवणूक होत असल्याचे आढळून येते.

Web Title: marathi news jalgaon debit card cash