आदेशाचे उल्लंघन...एसटी वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांचा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

शासनाने जमावबंदीचे आदेश देऊन पाचहून अधिक जणांना एकत्र न येण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना जळगाव आगार प्रशासनातर्फे शासनाच्या नियमांचे उल्लघंन करून कार्यशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारी  कामावर बोलाविले.

जळगाव ः कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही जळगाव आगार प्रशासनाने कार्यशाळेतील सर्व तीनशे कामगारांना कामावर बोलावले होते. तसेच सुरक्षा म्हणून मास्क किंवा सॅनेटायझर न दिल्याने कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. हीच परिस्थिती विभागीय कार्यालयात देखील होती. 

"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेसह बससेवाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून जळगाव आगारातूनही एकही बस बाहेर निघाली नाही. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ठेवणे व महामंडळाच्या देखील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांनाही कामावर बोलविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, शासनाने जमावबंदीचे आदेश देऊन पाचहून अधिक जणांना एकत्र न येण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना जळगाव आगार प्रशासनातर्फे शासनाच्या नियमांचे उल्लघंन करून कार्यशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारी  कामावर बोलाविले. तसेच या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी मास्क ना सॅनिटाईझर देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी नेरी नाक्‍याजवळील कार्यशाळेत यांत्रिक अभियंत्याच्या दालनात गोंधळ घातला. 

प्रतिनिधींची नियंत्रकांशी चर्चा 
कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीसंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी योगराज पाटील, गोपाळ पाटील, नरेंद्रसिंह राजपूत, राजेंद्र पाटील व शैलेश नन्नवरे यांनी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी भेट घेतली. नियमानुसार पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याची मागणी केली. यानंतर देवरेंनी नियमानुसारच या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामंडळाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon depo Staff Confusion at ST Workshop