जिल्ह्यात 4 हजार 629 हेक्‍टर क्षेत्रात कांदा लागवड 

जिल्ह्यात 4 हजार 629 हेक्‍टर क्षेत्रात कांदा लागवड 

जळगाव : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाण्याची शाश्वती शेतकऱ्यांना आहे. यामुळे अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत जवळपास 4 हजार 629 हेक्‍टरवर कांदा लागवड झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला आहे. कांदा लागवड वाढल्याने लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांचे भावदर एकरी 30 ते 35 हजार रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे एकरी लागवडीचा खर्च देखील वाढत आहे. सद्या कांद्याला चांगले भाव असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून लागवडीत वाढ होणार आहे. 
बेभरवशाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याकडे शेतकरी पुन्हा एकदा वळले आहेत. अवकाळीच्या फटक्‍याने शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीवरभर दिला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल 4 हजार 629 हेक्‍टरवर कांद्याची लागवड झाली असून यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.कांद्याला सध्या मोठी मागणी केली जात असून किरकोळ बाजारात कांद्याचे दर 80 ते 120 रुपये किलो दराने विक्री होत आहे. जिल्ह्यात ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यात कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उन्हाळी कांदा बाजारातून संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बाजारात कांदाची मोठी टंचाई निर्माण झाली असून भाववाढीचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. सध्या कांद्याच्या मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी असल्याने कांद्याचे भावही वाढत आहेत. सद्या कांद्याला भाववाढीने सुगीचे दिवस आल्याने जिल्ह्यातील शेतकरी रब्बी कांदा लागवडीकडे वळला असून गतवर्षीपेक्षा यंदा लागवड अधिक होणार आहे. 

चोपडा, एरंडोलमध्ये लागवड सर्वाधिक 
चोपडा व एरंडोल तालुक्‍यात सर्वाधिक कांदालागवड झाली आहे. कांदा पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळणार या आशेने शेतकरी रब्बी कांदा लागवडीवर भर देताना दिसत आहे यात चोपडा तालुक्‍यात आजपर्यंत 1 हजार 267 हेक्‍टर, तर एरंडोल येथे 1 हजार 203 क्षेत्रात कांदा लागवड झाली असून यात वाढ सुरूच आहे. 


जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. कांदा लागवडीची सुरवातीपासूनच काळजी घेतल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या अगोदर 30मिली ग्राम काबोसल्फान, 10 ग्राम बाविस्टिन व 10 लिटर पाणी यांचे द्रावणात कांद्याचे रोप साधारणपणे दहा मिनिटांपर्यंत बुडवून ठेवावे. त्यानंतर रोपावरील पात खोडून लागवड केल्यास याचा निश्‍चितच कांद्याला बुरशीपासून व करपा या रोगापासून बचाव होण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच लागवडीनंतर दहा दिवसांनी प्रति हेक्‍टर 10 किलो गंधक टाकावे, यामुळे कमी खर्चात उत्पन्नात वाढ होऊ शकते. 
-संजय ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव 

10 डिसेंबरपर्यंत रब्बी कांदा लागवड क्षेत्र 
जळगाव- 236 हेक्‍टर 
भुसावळ- 19 हेक्‍टर 
बोदवड- 45 हेक्‍टर 
यावल- 160 हेक्‍टर 
रावेर- 130 हेक्‍टर 
मुक्ताईनगर- 94 हेक्‍टर 
अमळनेर- 31.50 हेक्‍टर 
चोपडा- 1267 हेक्‍टर 
एरंडोल- 1203 हेक्‍टर 
धरणगाव- 605 हेक्‍टर 
पारोळा- 33 हेक्‍टर 
चाळीसगाव- 560 हेक्‍टर 
जामनेर- 86 हेक्‍टर 
पाचोरा- 33.50 हेक्‍टर 
भडगाव- 126 हेक्‍टर 
एकूण - 4629 हेक्‍टर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com