जळगाव जिल्ह्याच्या मृत्यूदरात घट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 257 इतकी झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, यातील कोरोनावर मात करून बरे झालेल्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 48 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत;

जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांवर पोचले होते. राज्यात सर्वांत जास्त मृत्यूचे प्रमाण जळगावात होते. परंतु, गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून, आता ते 8 टक्‍क्‍यांवर आल्याने कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदरात घर झाली आहे; तर रुग्ण बरे होण्याच्या संख्येत देखील वाढ झाल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 193 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यातील 170 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव शहरातील 7, भुसावळातील 13, भडगावमधील 1, धरणगाव 1 व खामगाव येथील एकाचा समावेश आहे. 

बरे होण्याचे प्रमाण वाढले 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 257 इतकी झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, यातील कोरोनावर मात करून बरे झालेल्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 48 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत; तर 33 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

एक रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह 
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावातील एक गर्भवती महिला समता नगरात नातेवाइकांकडे आली होती. या महिलेसह तिच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर पंधरा दिवसांनी या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर आज या व्यक्तीचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. 

सिंधी कॉलनी, जोशीपेठ "हॉट स्पॉट' 
शहरातील सर्व परिसरात आता "कोरोना' पसरत असून, दाट वस्तीसह आता उच्चभ्रू वस्तीत देखील कोरोनाचा 
शिरकाव झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा आकडा 54 इतका झाला असून, त्यात पाच सिंधी कॉलनी, पाच जोशीपेठ येथील रुग्ण असल्याने सिंधी कॉलनी, जोशी पेठ हे हॉट स्पॉट झाले आहे. शहरात चार जण मृत झाले आहेत. 

शहरात नवे 7 जण 
शहरातील नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे. आज जोशीपेठ, गांधीनगर, पिंप्राळ्यातील गणपतीनगर, सिंधी कॉलनी, सम्राट कॉलनी, आदर्शनगर या भागातील सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. सम्राट कॉलनीतील महिला ही पॉझिटिव्ह युवकाची आई असून, सिंधी कॉलनीतील मुलाच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

पिंप्राळ्यातील महिला परिचारिका 
शहरातील पिंप्राळा गणपतीनगरातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये परिचारिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्‍वारंटाइन करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district corona death ratio control