जळगावातील उद्योगाची चाके येणार रुळावर;  शंभरावर कंपन्या होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

कोरोना संसर्गामुळे सुरवातीला 21 दिवसांचे असलेले देशव्यापी लॉकडाउन नंतर 3 मेपर्यंत वाढविण्यात आले. यादरम्यान 20 एप्रिलला राज्यांनी स्थितीचा आढावा घेऊन, काही क्षेत्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाउनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरू करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून काही उद्योग सुरू होत आहेत. जळगावातील काही कंपन्यांनी त्यासाठी परवानगी मागितली असून, त्यांची चाके रुळावर येतीलही. पण, अन्य ठिकाणांहून येणारा कच्च्या मालाचा पुरवठा किती होतो आणि तो झाला तरी तयार उत्पादनाला मार्केट कुठे व कधी मिळणार? हा प्रश्‍न कायम असल्याने कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबतचा संभ्रम उद्योजकांमध्ये कायम आहे. 
कोरोना संसर्गामुळे सुरवातीला 21 दिवसांचे असलेले देशव्यापी लॉकडाउन नंतर 3 मेपर्यंत वाढविण्यात आले. यादरम्यान 20 एप्रिलला राज्यांनी स्थितीचा आढावा घेऊन, काही क्षेत्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आजपासून (ता. 20) काही अटी-शर्ती घालून देत उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

फूड इंडस्ट्री होती सुरू 
लॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय, संस्था बंदचे आदेश होते. मात्र, जीवनावश्‍यक वस्तूंसह फूड इंडस्ट्री, कृषी उद्योगांना त्यातून वगळले होते. जळगाव एमआयडीसीत डाळ मिल, तेल कंपन्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. शिवाय, कृषी उत्पादनांचे प्रक्रिया उद्योगही आहेत. त्यामुळे मर्यादित क्षमतेने का होईना, या कंपन्या लॉकडाउनच्या काळातही सुरू होत्या. 

शंभरावर कंपन्या होणार सुरू 
लॉकडाउनमधून काहीअंशी शिथिलतेनंतर आता जळगाव एमआयडीसीतील काही कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प, उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत. या एक-दोन दिवसांत शंभरावर कंपन्यांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले असून, या सर्व कंपन्या एक-दोन दिवसांत सुरू होतील, अशी चिन्हे आहेत. 

रुळावर यायला लागेल आठवडा 
अशा स्थितीत या कंपन्या सुरू होत असल्या, तरी त्या पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आणखी आठवडाभर तरी लागणार आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्याने स्थानिक कामगारांनाही कंपन्यांपर्यंत पोचण्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे कामगारांच्या संख्येवरही परिणाम होणार असल्याने कंपन्या पूर्ण क्षमतेने चालू होऊ शकत नाहीत, अशी अवस्था आहे. 

जिनिंग- प्रेसिंगसमोरही समस्या 
जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने येथे जिनिंग- प्रेसिंग कंपन्यांची संख्याही मोठी आहे. जामनेर, शेंदुर्णी, पहूर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आदी ठिकाणी जिनिंगची संख्या चांगली आहे. कापूस स्थानिक ठिकाणीच उपलब्ध असल्याने कच्च्या मालाची अडचण नाही. मात्र, जिनिंगमध्ये तयार होणाऱ्या उत्पादित मालाला बाजारपेठ सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे जिनिंग सुरू करून खर्च का वाढवून ठेवायचा, असा प्रश्‍न जिनिंग मालकांसमोर आहे. 
 
पाच हजार ट्रॅव्हल्स पास वितरित 
ज्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करायचे आहेत, त्यांनी ऑनलाइन अर्ज करायचे. त्यातील कामगारांची संख्या द्यायची व प्रशासन त्यांना ई-ट्रॅव्हल्स पास वितरित करेल अशी पद्धत आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळपर्यंत शंभरावर कंपन्यांनी अर्ज केले होते. जिल्हा प्रशासनाने जवळपास पाचशे कामगारांना ऑनलाइन ट्रॅव्हल्स पास वितरित केले आहेत; तर जैन इरिगेशनला साडेतीन हजारांपेक्षा अधिक व सुप्रिम कंपनीला 1200 ऑफलाइन पास देण्यात आले आहेत. 

या आहेत अडचणी 
जळगाव एमआयडीसीत डाळ प्रक्रिया, तेल निर्मिती कंपन्या, कृषिवर आधारित पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या व चटई उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. केमिकल्सचे चार-पाच प्लॅंट आहेत. यापैकी बहुतांश कंपन्या सुरू होत असल्या, तरी ज्या उत्पादनांसाठी अन्य जिल्ह्यातून, परप्रांतातून कच्चा माल आणावा लागतो, त्याचा मोठा प्रश्‍न आहे. चटई उद्योग मोठा असून, तो सुरू करायला कच्च्या मालाची अडचण नाही, कारण हा माल स्थानिक पातळीवरच उपलब्ध होऊ शकतो. मात्र, उत्पादित मालाला (फिनिश्‍ड गुड्‌स) बाजारपेठच उपलब्ध होणार नाही, तर हा माल विकणार कुठे असा प्रश्‍न आहे. मार्केट सुरू झाल्यानंतरही उत्पादनांना मागणी किती राहील, हे अनिश्‍चित आहे. अन्य उत्पादनांचीही स्थिती जवळपास हीच आहे. शिवाय, काही कंपन्यांमध्ये परप्रांतीय व अन्य जिल्ह्यातील मजूर, कामगार आहेत, ते त्यांच्या गावी निघून गेल्याने कामगारांचीही मोठी अडचण आहे. 

या आहेत अटी-शर्ती 
कंपनी सुरू करण्यासाठी संबंधितांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ज्या कंपन्या सुरू होतील, त्यातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून परवाना (पास) देण्यात येणार आहे. कंपनी सुरू करताना काही नियम, अटी प्रशासनाने घालून दिल्या आहेत. 

- सर्व कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाला देणे 
- स्थानिक कर्मचाऱ्यांनाच बोलावणे 
- सर्वांना मास्क अनिवार्य करणे 
- सॅनिटायझेशनची व्यवस्था करणे 
- काम करताना सोशल डिस्टन्स पाळणे 
- प्रत्येक कर्मचाऱ्याचे तापमान रोज तपासणे 
 
प्रशासनाकडे कंपनी सुरू करण्यासंबंधी ऑनलाइन परवानगी मागितली आहे. मंगळवारपासून कंपनीचे कामकाज सर्व आवश्‍यक सूचनांचे पालन करून सुरू करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची काळजी घेणार आहोत. कंपनी महिनाभरापासून बंद असली, तरी सामाजिक बांधिलकी व पालकत्वाच्या नात्याने कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे ठरविले आहे. 
- भालचंद्र पाटील, संचालक, वेगा केमिकल्स 

सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत, सूचनांचे पालन करत काही कंपन्या एक-दोन दिवसांत सुरू होत असल्या, तरी त्यांना बाहेरून येणारा कच्चा माल किती व कधी उपलब्ध होतो, याची शाश्‍वती नाही. शिवाय, संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने तयार उत्पादनांना मार्केटच उपलब्ध नसेल तर हे उत्पादन अंगावर पडेल, अशी भीतीही कारखानदारांना आहे. बाजारपेठ सुरू झाल्याशिवाय कंपन्याही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नाहीत. 
- श्‍यामसुंदर अग्रवाल, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असो. ऑफ इंडस्ट्रीज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district industry open lockdown