esakal | डॉक्‍टरांसाठीही आता जनजागृतीची मोहीम; रुग्णांना ऑनलाईन द्या सेवा 

बोलून बातमी शोधा

online docter

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. त्यात वैद्यकीय यंत्रणा सर्वांत आघाडीवर असून या यंत्रणेतील प्रमुख घटक म्हणून डॉक्‍टर व नर्स, वॉर्डबॉय यासह अन्य घटकांचे योगदान महत्त्वपूण आहे.

डॉक्‍टरांसाठीही आता जनजागृतीची मोहीम; रुग्णांना ऑनलाईन द्या सेवा 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जगासह आता देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानंतर त्याच्याशी लढा देणाऱ्यांत सर्वांत पुढे असलेल्या डॉक्‍टरांनीही काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आता डॉक्‍टरांच्या जनजागृतीची मोहीम सुरु झाली असून त्याअंतर्गत डॉक्‍टरांनी रुग्णांना किरकोळ आजारांसाठी प्रत्यक्ष दवाखान्यात न बोलावता ऑनलाइन औषधी देण्यासह अनेक पर्याय सूचविले जात आहेत. 
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. त्यात वैद्यकीय यंत्रणा सर्वांत आघाडीवर असून या यंत्रणेतील प्रमुख घटक म्हणून डॉक्‍टर व नर्स, वॉर्डबॉय यासह अन्य घटकांचे योगदान महत्त्वपूण आहे. अशा स्थितीत डॉक्‍टरांनी रुग्णांच्या अन्य किरकोळ आजारांसह नियमित तपासणीदरम्यान विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आता काही तज्ज्ञ आपापल्या वतीने सूचना देत असून त्यातून डॉक्‍टरांमध्येही जनजागृती केली जात आहे. 

असे सूचविले पर्याय 
मानसोपचार समुपदेशक नीरज देव यांनी काही पर्याय डॉक्‍टरांसाठी सुचविले आहेत. त्यात दिवसातून मोजके व अत्यावश्‍यक तेवढेच रुग्ण बघावे, दोन, तीन वा कधीकधी अधिक वेळा prescription साठी एकच लेटरहेड वापरले जाते. तर काही जण मागील भागही वापरतात... सध्या काही दिवस आपण प्रत्येक वेळी रुग्णाला नवीन कागद द्यावा, शक्‍यतो रुग्णाचे रिपोर्टस प्रत्यक्ष न बघता डिजिटली बघावे, जुने रिपोर्टस गरज असेल तेव्हाच बघावे, prescription व रिपोर्टस डिजिटल स्वरूपात द्यावे, शुल्क घेताना डिजिटल घेता आले तर उत्तम. 
 
किराणा दुकानांवर माहितीपत्रक 
होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील व त्यांच्या सोबतच्या काही डॉक्‍टरांनी तपासणीबाबत आवाहन करताना किरकोळ आजारासाठी रुग्णांनी डॉक्‍टरकडे न जाता, त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्रास काय होतोय, ते सांगावे व व्हॉटस्‌ऍपवर औषधी मागून घ्यावी, ती औषधी घेण्यासाठी फक्त मेडिकलला जावे, असे म्हटले आहे. या व अन्य सूचनांचे माहितीपत्रक छापून ते रुग्णांच्या जागृतीसाठी प्रत्येक किरणा दुकानावर दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. त्यातून घरबसल्या उपचार घेता येतील, बाहेर जायची गरज पडणार नाही. तसेच यामुळे विविध स्पेशालिस्ट डॉक्‍टरांवरील ताणही कमी होईल.