"सायलंट कॅरिअर'ची संख्या जळगावात मोठी असण्याची भीती; "युके'तील डॉ. संग्राम पाटील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

डॉ. पाटील मूळ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील असून ते सध्या ब्रिटनमध्ये (युके) एका हॉस्पिटलमध्ये आयसीयू प्रमुख असून कोरोना फायटर म्हणून सेवा बजावत आहेत. जळगावातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदराबाबत डॉ. पाटील यांनी "सकाळ'शी संवाद साधत विश्‍लेषण मांडले. 

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर अधिक असणे हा केवळ सांख्यिकी दोष असून त्यामुळे ते आरोग्य यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही. वृद्ध व आधीच विविध आजार असलेले रुग्ण त्यात अधिक असल्यामुळे हा मृत्यूदर अधिक वाटतो. प्रत्यक्षात "सॅम्पल साईज' लहान असल्याचा हा परिणाम आहे, असे विश्‍लेषण "युके'त वैद्यकीय सेवेत असलेले खानदेशातील सुपूत्र डॉ. संग्राम पाटील यांनी मांडले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांची अर्थात "सायलंट कॅरिअर'ची संख्या जळगाव जिल्ह्यात मोठी असण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. 
डॉ. पाटील मूळ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील असून ते सध्या ब्रिटनमध्ये (युके) एका हॉस्पिटलमध्ये आयसीयू प्रमुख असून कोरोना फायटर म्हणून सेवा बजावत आहेत. जळगावातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदराबाबत डॉ. पाटील यांनी "सकाळ'शी संवाद साधत विश्‍लेषण मांडले. 

तांत्रिक दोषाचा परिणाम 
डॉ. पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या पन्नाशीपर्यंत पोचते तोवर 13 मृत्यू झाले. मात्र, या सर्व केसेसचा अभ्यास केला असता कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. शिवाय, त्यांना आधीच विविध आजारही होते. म्हणजे ते "हाय रिस्क' फॅक्‍टर होते, आणि प्रकृती खालावल्यानंतर दाखल झाल्याने त्यांच्या वाचण्याची शक्‍यता कमी होती. यातील तीन-चार रुग्ण तर मृतावस्थेतच दाखल झाले. त्यामुळे हा मृत्यूदर अधिक आहे, असे म्हणता येणार नाही. 

"सायलंट कॅरिअर' जास्त 
खानदेशात या टप्प्यात रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे, अन्य मोठ्या शहरांमधून मोठ्या संख्येने लोक खानदेशात पोचले असतील. ज्यांच्यात लक्षणे नाहीत, ते सर्रास फिरत असतील. त्यातून संसर्गाचा धोका वाढतोय. विशेष म्हणजे, अशाप्रकारच्या लक्षणे नसलेल्या सायलंट कॅरिअर बाधितांची संख्या मोठी असेल. ते अन्य रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना संक्रमित करत असतील, आणि त्यातून हा आकडे वाढतोय. त्यासाठी बाधित रुग्ण आढळून येत असलेल्या भागात सरसकट सर्व नागरिकांची कोविड-19ची चाचणी करुन घेतली पाहिजे, असे डॉ. पाटील यांनी सूचविले. 
 
"फॉल्स निगेटिव्ह'चे प्रमाणे 40 टक्के 
दुर्दैवाने कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तीही विलगीकरणाच्या (क्वारंटीन) भीतीने तपासणीसाठी पुढे येताना दिसत नाही. त्यातूनही संक्रमणाचा धोका वाढतो. याशिवाय, कोरोनाच्या चाचणीत "फॉल्स निगेटिव्ह'चे प्रमाणे 30 ते 40 टक्के आहे. ते केवळ भारतात नव्हे तर इकडे ब्रिटनमध्येही तेवढेच आहे. त्यामुळे बाधित असूनही काही रुग्ण निगेटिव्ह आल्यास त्यांच्यापासूनही संसर्गाचा धोका मोठा असतो. 

असे सांगितले उपाय 
-
लक्षण नसलेल्यांची सरसकट चाचणी करावी 
- प्राथमिक लक्षणे असलेल्यांनी तपासणीसाठी पुढे यावे 
- आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारावा 
- खासगी डॉक्‍टर्सना सहभागी करुन घ्यावे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon doctor sangram patil uk jalgaon saylant carrier jalgaon corona