esakal | शहरांशी संपर्क नसल्याने आदिवासी पट्टा "सेफ' ...खानदेशातील चित्र !
sakal

बोलून बातमी शोधा

satpuda adivasi pada imege

जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा या तीन तालुक्‍यांसह मुक्ताईनगर तालुक्‍यातही काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. त्यांना कोरोना संसर्गाचा धोका किती, यासंदर्भात मते जाणून घेतली असता विविध विचार समोर आलेत. 

शहरांशी संपर्क नसल्याने आदिवासी पट्टा "सेफ' ...खानदेशातील चित्र !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : खानदेशातील आदिवासी क्षेत्रातील लोकांचा शहरांशी फारसा संपर्क नसल्याने ते कोरोना संसर्गापासून "सेफ' आहेत. या आदिवासींमधील रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असते. विशेषतः महिलांमध्ये तर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांनी या संक्रमणापासून दूर राहणे हेच हिताचे आहे, असे आदिवासी भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रांतात राहणाऱ्या समुदायाच्या रोगप्रतिकारशक्तीचा उल्लेख सध्या विविध चर्चांमधून केला जात आहे. खानदेशात नंदुरबारसह धुळे, जळगाव जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र मोठे आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा या तीन तालुक्‍यांसह मुक्ताईनगर तालुक्‍यातही काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. त्यांना कोरोना संसर्गाचा धोका किती, यासंदर्भात मते जाणून घेतली असता विविध विचार समोर आलेत. 

रोगप्रतिकारशक्ती कमीच 
प्रतिभा शिंदे (लोकसंघर्ष मोर्चा) : राज्यातील "ह्यूमन इंडेक्‍स' कमी असलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये जालना वगळता सर्व जिल्हे आदिवासी बहुल आहेत. त्यावरून आदिवासींमधील शिक्षण, आरोग्य व अन्य घटकांचे प्रमाण दिसते. आदिवासी महिलांमध्ये हिमोग्लोबिन अत्यंत कमी असते, त्यामुळे त्यांची मुलेही कुपोषित असतात. त्यातून सिकलसेलसारखे आजारही त्यांच्यात अधिक आहे. अशा स्थितीत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. सध्या हे आदिवासी शहरांपासून विलग असल्याने तेवढा त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. मात्र, एखाद्याला लागण झाली, तर ते गंभीर ठरू शकेल. 

शहरांपासून दूर असल्याने "सेफ' 
राजेंद्र गाडगीळ (पक्षीमित्र, अभ्यासक) : आपल्या भागातील आदिवासींचा शहरांशी फारसा संपर्क येत नाही. त्यांच्या भागात कुणीही जात नाही आणि तेदेखील या दुनियेपासून अलिप्त असतात. त्यामुळेच कोरोनाच्या कहरात अद्याप तरी हे लोक "सेफ' आहेत. मात्र, त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती फार असते, असे समजण्याचे कारण नाही. एकदा त्यांच्यात संक्रमण झाले, की ते वाढतच जाण्याचा धोका अधिक आहे. 

संक्रमणाचा धोका कमीच 
राजेंद्र नन्नवरे (सचिव, सातपुडा बचाव समिती) : आपल्या क्षेत्रातील आदिवासी बांधव मुख्यत्वे त्याच भागात राहतात, त्यांचा शहरांमध्ये फारसा वावर नसतो. 15 मार्चला आम्ही मेळघाटला होतो, तेथे ही मंडळी त्यांच्या उत्सवात मश्‍गूल होती. त्यांना अशा संसर्गांच्या विषयांशी काही देणेघेणे नसते. आपल्या आदिवासी बांधवांचेही तसेच आहे. जोपर्यंत संक्रमित व्यक्ती त्यांच्यात मिसळणार नाही, तोपर्यंत त्यांना हा धोका नाहीच. मात्र, संसर्ग झाला, तर हे लोक अधिक प्रभावित होऊ शकतील. 
 

loading image