खरेदी-विक्री दस्त नोंदणी केवळ 20 मिनिटांत 

देविदास वाणी
मंगळवार, 19 मे 2020

दस्त नोंदणीसाठी नोंदणी विभागाने "ई-स्टेप-इन' सुविधा सुरू केली आहे. त्याचा वापर करून पक्षकार आपला वेळ वाचवू शकतात. जिल्ह्यात प्रथमच अशी सुविधा सुरू झाली आहे. "कोरोना' संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. पक्षकारांना सॅनिटाइज करूनच सर्व व्यवहार होत आहेत. 
- सुनील पाटील, दुय्यम निबंधक, जळगाव. 

जळगाव : घर, बंगला, इतर मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी सर्वांनाच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचा क्रमांक केव्हा येईल, याची तासनतास वाट पाहावी लागते. आता मात्र घर, प्लॅट इतर मालमत्ता खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी वाट पाहण्याची गरज नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात आता "ई-स्टेप-इन' सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा उपयोग करून केवळ वीस मिनिटांत आपल्या खरेदी-विक्रीची दस्तऐवज नोंदणी होणार आहे. या सुविधेमुळे सर्वांचा वेळ वाचणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 

नागरिकांना खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ ऑनलाइन आरक्षित करून घेण्यासाठी विभागाने 'ई-स्टेप-इन ' उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेद्वारे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी वेळ आरक्षित करता येते. 

दस्त नोंदणीसाठी पक्षकाराने दुय्यम निबंधक कार्यालयात, आरक्षित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी येणे आवश्‍यक आहे. दस्त देऊन निघून गेले तरी चालेल. जी वेळ दिली त्या वेळेवर खरेदीदार, विक्रेता, साक्षीदार, इतर हक्कदार असतील तर ते अशांनी उपस्थित राहावयाचे आहे. वेळ झाल्यावर लागलीच त्यांना बोलावून वीस मिनिटांत ओळख करून, त्यांचे बोटाचे ठसे घेतले जातील. 

या सुविधेचा वापर करून खालील कालावधीतील सोयीची वेळ आरक्षित करता येते. 
- सकाळी 10 ते सायंकाळी 6 ही कामाची वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत. 
- सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत कामाचा वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत. 
- दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत कामाची वेळ असलेल्या कार्यालयात दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत. 

या सुविधेचे फायदे... 
- ई-स्टेप-इन या सुविधेचा वापर करून आपण दस्त नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करू शकता. 
- ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपणांस दस्त नोंदवावयाचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी 'ई-स्टेप- इन' सुविधेसाठी वेगळ्या ठेवलेल्या वेळेपैकी आपल्या सोईची वेळ आरक्षित करता येत असल्याने रांगेमध्ये थांबण्याची आवश्‍यकता नाही. 
- वेळेवर नोंदणीसाठी पोचल्यावर सेवा मिळत असल्याने वेळेची बचत होते. 
- सामाईक कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयातील आरक्षित झालेल्या वेळा माहिती होतात. त्यानुसार आपल्या सोयीची वेळ निवडता येते. 
नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-Step- in या ठिकाणी उपलब्ध आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon e-step sestym 20 minits ragistration