अंडापाव गाड्यांवर "रात्रीस खेळ चाले' 

ege loary jalgaon
ege loary jalgaon

जळगाव : वाइन शॉपच्या दारात दहा वाजेपर्यंत आणि त्यानंतर पहाटे दोन वाजेपर्यंत अंडापाव गाड्यांवर दारूड्यांची जत्राच भरते. संपूर्ण शहरात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार रात्री याच गाड्यांवर आसऱ्याला असतात. यथेच्छ दारू ढोसल्यानंतर आपल्या "टार्गेट' परिसरावर उपद्रव माजवतात. काल (ता. 18) रात्री कोंबडी बाजारात घडलेल्या खुनाची घटनाही याच अंडागाडीवर "रात्रीस खेळ चाले' प्रकारातून घडली आहे. आता तरी याचे गांभीर्य पोलिस दलाने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

कोंबडी बाजार चौकात मध्यरात्री तरुणावर शस्त्राने हल्ला होऊन तो जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. शंभर मीटर पळाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंबडी बाजारात रात्री उशिरापर्यंत लागणाऱ्या ज्या अंडापाव गाडीवर हाणामारी झाली, त्यानेही पोलिसांना कळवले नाही. कारण अशा हाणामाऱ्या दररोज घडतात. रात्रीचा खेळ रात्रीच संपलेला असतो. परिणामी पोलिसांपर्यंत या घटना पोहचत नाहीत आणि पोचल्या तरी दारूड्यांचा वाद म्हणून दमदाटी करून पोलिस रवानगी करतात. शहरात रात्रीतून घडणाऱ्या घात, अपघात, हाणामाऱ्या असोत, की घरफोड्यांचे गुन्हे, त्यात सहभागी गुन्हेगारांचा या रस्त्यांवरील मयखान्यांशी जवळचा संबंध आहे. रात्री घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांपैकी तब्बल 80 टक्के गुन्ह्यांना "वाइन शॉप' आणि अंडापाव गाड्यांवर चालणारे मयखाने जबाबदार आहेत. 

बाजाराप्रमाणे प्रसिद्ध ठिकाणे 
अजिंठा चौक, कालिंका चौकासमोरील रोड, ईच्छादेवी चौक, प्रभात चौक, शिवकॉलनी स्टॉप, गुजराल पेट्रोलपंप, कृषी उत्पन्न बाजार समिती रोड ही महामार्गावर दारू पिण्यासाठी मोकाट ठिकाणे आहेत. शहरातील प्रसिद्ध ठिकाणे अशोक टॉकीज्‌ची गल्ली, अजिंठा चौक, भजे गल्लीचे "वाइन शॉप', रेल्वेस्टेशन, झेडपीची गल्ली आहेत. दारूड्यांच्या जत्रेसाठी शाहूनगर पोलिस लाइन प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. मीर शुक्रुल्ला उद्यानाच्या जागेवर रात्री अकरापर्यंत व नंतर या गाड्या शाहुनगरात वस्तीमध्ये शिरून पहाटेपर्यंत दारूड्यांसाठी सेवा देतात. 

पोलिस ठाण्यांचे हप्ते 
उपविभागात सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 10 वाजेला आस्थापना बंदचे आदेश आहेत. मात्र, दारूड्यांना सेवा देणाऱ्या अंडाभुर्जीच्या गाड्यांना स्थानिक पोलिस ठाण्यांचे बीट अंमलदार, गस्ती पथकाचे संरक्षण प्राप्त आहे. महिन्याला ठरलेली रक्कम आणि गस्तीपथकाला रात्रीचा नाश्‍ता या गाड्यांवर मोफत दिला जातो, असे सांगितले जाते. कारण तक्रारी आल्यावर त्या निपटण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते. 

बरगडी मोडून गुन्हा नाहीच 
तीन वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील या तरुणाचा खून अशाच वादातून झाला होता. काल खुनाची घडली त्याच ठिकाणी मेहबूब खाटीक ऊर्फ मामू हे वयोवृद्ध गृहस्थ अंडागाडी लावतात. गेल्या आठवड्यात त्यांना गेंदालाल मिलच्या गुंडांनी बेदम मारहाण करून त्यांची एक बरगडी मोडली. जखमी वृद्धाने पोलिस ठाणे गाठले. मात्र, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्याची तसदी शहर पोलिसांनी घेतली नाही. तेव्हाच उपाययोजना केली असती तर कदाचित बुधवारच्या रात्रीचा खून टाळता आला असता, असेही आता बोलले जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com