आमदारकीसाठी कोल्हापुरातून पुण्याला कोण गेले? : एकनाथराव खडसे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

आम्ही येथेच निवडणुका लढवून यश मिळविले. निवडणूक जिंकण्यासाठी कोल्हापूरहून पुण्याला जावे लागले नाही, मग तिथे गेले कोण? असा टोला भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

जळगाव : भारतीय जनता पक्ष शून्य होता, त्यावेळेपासून आपण काम करीत आहोत. जळगाव जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजप आपण केले आहे. त्यामुळे पक्ष आमचे ऐकत होता. आम्ही सांगितला, तो उमेदवार दिला गेला. आम्ही येथेच निवडणुका लढवून यश मिळविले. निवडणूक जिंकण्यासाठी कोल्हापूरहून पुण्याला जावे लागले नाही, मग तिथे गेले कोण? असा टोला भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

मुक्ताईनगर येथील त्यांच्या निवासस्थानी "साम'टीव्हीच्या चर्चेत ते सहभागी झाले होते, त्यावेळी ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात पक्ष आम्ही उभा केला. या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व नसताना तब्बल 27 वर्षे जिल्हा परिषद पक्षाच्या ताब्यात ठेवली. सन 1989 पासून केवळ दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून येत आहेत. गेली 40 वर्षे आम्ही जिल्ह्यात पक्ष वाढविला, त्यामुळे पक्षही आमचे ऐकत होता. आम्ही सांगितला तो उमेदवार पक्षाने दिला आणि आम्ही तो निवडूनही आणला. आम्हीही आमच्या मतदारसंघात सतत आठ वेळा निवडून आलो आहोत. आम्ही जिल्हा शत-प्रतिशत भाजपमय केला. परंतु कोल्हापूर आज भाजपमुक्त आहे. आम्हाला निवडून येण्यासाठी कोल्हापूरहून पुणे येथे जावे लागलेले नाही. 

महाजनांशी संबंध चांगलेच 
गिरीश महाजन यांच्याबाबतीत बोलताना ते म्हणाले, की गिरीश महाजन जामनेर येथे सरपंच असतानाच्या काळात त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्याबाबत आपण प्रयत्न केले होते. त्यांचे व माझे संबंध चांगलेच आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत आपण अधिक बोलू इच्छित नाही. 

चंद्रकांतदादांना का हवीत पदे? 
खडसेंनी मार्गदर्शक व्हावे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे, त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले, की चंद्रकांतदादा पाटील यांनी आता मार्गदर्शक व्हावे, त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी. त्यांनीही पदे, मंत्रिपदे तसेच प्रदेशाध्यक्षपद का भूषवावे? 

सहकारात पक्षीय राजकारण कसे? 
जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघात घरच्यांना पदे दिल्याचा चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, की सहकार क्षेत्र पक्षीय राजकारणापासून वेगळे असते. महानंद, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्था आहेत. त्यात भाजप कुठे आला? जिल्हा बॅंकेत मुळातच भाजपचे वर्चस्व नव्हते व आजही नाही. केवळ चार सदस्य आहेत. तरीही माझ्यावर विश्‍वास असल्याने मुलीला अध्यक्ष करण्याचा सर्वपक्षीयांनी निर्णय घेतला. जिल्हा दूध संघातही हाच "फॉर्म्युला' वापरला गेला. या सहकारी संस्थांमध्ये भाजपचा चेअरमन गेल्या अनेक वर्षांत झालेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना पक्षाने पदे दिली, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. खडसे कुटुंबात एकमेव रक्षा खडसे खासदार आहेत, बाकी कोणाकडे राजकीय पदे कोणती आहेत हे त्यांनी दाखवून द्यावीत, असे आव्हानही श्री. खडसे यांना पाटलांना दिले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse and chandrakant patil election waar