पक्षांतर्गत विरोधकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई : खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

राज्याच्या काही भागात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचीही माहिती जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांना धक्का बसला. माझे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची चार दिवसांपूर्वी आपण भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकीत स्वकियांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने भाजपला फटका बसला, याचीही माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेत नड्डा यांनी चौकशीअंती जे दोषी असतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. 
लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी एकनाथराव खडसे आज सायंकाळी जळगावात आले होते. या समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. श्री. खडसे पुढे म्हणाले, राज्याच्या काही भागात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचीही माहिती जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांना धक्का बसला. माझे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. मी दिलेली माहिती तसेच पक्षाकडे असलेल्या माहितीच्या आधारे चौकशी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी नड्डा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसेच पंकजा मुंडेंना भेटीसाठी दिल्लीत बोलावले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नंतर बोलावले जाणार आहे. सर्वांच्या उपस्थितीत चर्चा करून चांगला निर्णय घेऊ. चौकशीत जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्‍चितच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावर त्यांनी बोलणे टाळले. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, "तो त्यांचा विषय आहे. मी काय बोलू', असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कारवाईनंतरच समाधानी 
पक्षाच्या भूमिकेबाबत श्री. खडसे म्हणाले, की पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आता पक्षाच्या भूमिकेसंदर्भात मी समाधानी आहे किंवा नाही हे कारवाईनंतरच कळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknathrao khadse Bjp party