"त्या' दांपत्याच्या संपर्कातील  अकरा जण क्‍वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या त्या दांपत्याचे अमळनेर येथे किराणा दुकान आहे. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी या दांपत्याचा अनेक नागरिकांसोबत संपर्क आल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जळगाव : अमळनेर येथील झामी चौकातील एका दांपत्याचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले होते. यातील पॉझिटिव्ह महिलेचा अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दांपत्याच्या संपर्कात आलेले त्याच्या कुटुंबीयांसह एकूण 11 जणांना आज शहरातील शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंटाईन करण्यात आले आहे; तर अमळनेर शहरातील रुग्ण दांपत्य राहत असलेला परिसर "कॉन्टेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने अमळनेर येथील झामी चौकातील दांपत्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना कक्षात दाखल झाले होते. यातील त्या महिलेचा 19 एप्रिलला मृत्यू झाला होता. अखेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास या दांपत्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे प्रशासनाला हादरा बसून संपूर्ण अमळनेर शहर लॉकडाउन करीत ते दांपत्य राहत असलेला संपूर्ण परिसर रात्रीच सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

दांपत्याचा अनेकांशी संपर्क 
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या त्या दांपत्याचे अमळनेर येथे किराणा दुकान आहे. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी या दांपत्याचा अनेक नागरिकांसोबत संपर्क आल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे रुग्ण आतापर्यंत कोणाकोणाच्या संपर्कात आले, याबाबतची संपूर्ण माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. 

स्वॅब तपासणीसाठी रवाना 
अमळनेर येथील दांपत्याच्या संपर्कातील अकरा जणांना प्रशासनाकडून मंगळवारी (ता. 21) रात्रीच क्‍वारंटाईन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी आज त्यांची तपासणी करून स्वॅब तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. 

61 अहवाल प्रलंबित 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या आज 36 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 365 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 288 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 61 संशयित रुग्णांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

तीन दिवसांतील प्रलंबित अहवाल 
कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची तपासणी देखील केली जात आहे. त्यात 20 एप्रिलला पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 4 , 21 ला पाठविण्यात आलेल्यांपैकी 21, तर आज पाठविण्यात आलेले 36 असे एकूण 61 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eleven of the couple's contacts were quarantined