पोर्टेबल यूव्हीसी सॅनिटायझर बॉक्‍सची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधन साहित्यांमधून "कोरोना'पासून संरक्षणासाठी "पोर्टेबल यूव्ही-सी सॅनिटायझर बॉक्‍स'ची निर्मिती केली आहे.

जळगाव : "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा बजावणारे डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस, सफाई कामगार आदींच्या अंगावरील पीपीई कीट, घड्याळ मोबाईल व अन्य साहित्य निर्जंतुक करण्यासाठी "पोर्टेबल यूव्ही-सी सॅनिटायझर बॉक्‍स'ची निर्मिती रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधन साहित्यांमधून "कोरोना'पासून संरक्षणासाठी "पोर्टेबल यूव्ही-सी सॅनिटायझर बॉक्‍स'ची निर्मिती केली आहे. ज्यावेळी डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस, सफाई कर्मचारी आदी "कोरोना फायटर्स' आपले कर्तव्य संपल्यावर घरी जातात तेव्हा त्यांच्या अंगावरील पीपीई कीट, घड्याळ, मोबाईल या बॉक्‍समध्ये ठेवल्यास ते निर्जंतुकीकरण करता येऊ शकतात. 

अल्ट्रा वायोलेट किरणांचा वापर 
"पोर्टेबल युव्ही- सी सॅनिटायझर बॉक्‍स' हा अल्ट्रा वायोलेट किरणांचा वापर करून बॅक्‍टेरिया आणि वायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारतो. 100 ते 280 नॅनोमीटर, मुख्यतः 254 नॅनोमीटरचे अल्ट्रा वायोलेट किरण हे विषाणू व सूक्ष्म जिवाणू पूर्णपणे मारण्यास अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. पोर्टेबल युव्ही- सी सॅनिटायझर बॉक्‍स हा ऑर्डिनोया तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आला आहे. यासाठी ऑर्डिनो सॉफ्टवेअरमध्ये प्लॅटफॉर्मचा उपयोग करून प्रोग्रॅमिंग करण्यात आलेली आहे. ऑर्डिनो मायक्रो कंट्रोलर हा पूर्ण सॅनिटायझर बॉक्‍सची सॅनिटायझ करण्याची पूर्ण वेळ आणि प्रक्रिया निर्धारित करतो. पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्‍स हा वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांनी वापरलेले पोशाख आणि साहित्य पूर्णपणे निर्जंतुक करतो. 
युव्ही- सी सॅनिटायझर बॉक्‍समधे लावण्यात आलेले युव्ही- एलईडी हे युव्ही- सी किरणांचा मारा करून बॅक्‍टेरिया आणि वायरस यासारखे सूक्ष्मजिवाणूंचा डीएनए निकामी करून त्यांचा अंत करतात. ही पूर्ण प्रक्रिया बाहेर लावण्यात आलेल्या एलइडी स्क्रीनवर बघता येते. युव्ही- सी किरणांपासून मानवी अवयवांवर होणाऱ्या घातक परिणामांपासून बचावासाठी पोर्टेबल युव्ही- सी सॅनिटायझर बॉक्‍सचे दारे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच युव्ही- एलईडी काम करायला सुरवात करते. विद्यार्थ्यांनी हा बॉक्‍स फक्‍त 620 रुपयांत तयार केला आहे. 
 
विद्यार्थ्यांचे केले कौतुक 
पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्‍सचे डिझाईन आणि निर्मितीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेचे विभागप्रमुख प्रा. हरीश भंगाळे, प्रा. मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश सोनवणे, शुभांगी मोरे, ज्योत्स्ना माळी, हर्षा वालदे या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल आदींनी कौतुक केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon engineering student creat portable sanitiser box